मुंबई: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका आनंदी कुटुंबाचा रात्रीचा जेवणाचा बेत शेवटचा ठरेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. रात्री बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्यानंतर काही तासांतच डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण मुघल बिल्डिंग आणि पायधुनी परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं? शनिवारी रात्री डोकाडिया कुटुंबाने एकत्र मिळून बिर्याणी खाल्ली. जेवणानंतर साधारण रात्री दीडच्या सुमारास कुटुंबाने कलिंगड खाल्ले. मात्र, हे कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील सदस्यांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. अब्दुल्ला डोकाडिया (४०), त्यांची पत्नी नसरीन (३५), मोठी मुलगी आयशा (१६) आणि लहान मुलगी झैनब (१३) या चौघांचीही प्रकृती वेगाने बिघडली आणि ते घरातच बेशुद्ध पडले.
डॉक्टरांचा थरारक अनुभव शेजाऱ्यांनी तातडीने इमारतीतील रहिवासी असलेल्या डॉ. कुरेशी यांना मदतीसाठी बोलावले. डॉ. कुरेशी जेव्हा घरात पोहोचले तेव्हा दृश्य अत्यंत भयानक होते. चौघेही रक्ताच्या उलट्या करून बेशुद्ध पडले होते. डॉ. कुरेशी यांनी सांगितले की, “मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा लहान मुलीची नाडीही सापडत नव्हती. मी तातडीने सीपीआर दिला, पण त्यांच्या शरीरात विष इतक्या वेगाने भिनले होते की त्यांचे रक्त आम्लयुक्त (Acidic) झाले होते.”
तात्काळ सर्वांना साबू सिद्दिकी आणि जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मृत्यूने या कुटुंबावर आधीच झडप घातली होती. उपचारादरम्यान एकापाठोपाठ एक अशा चौघांचाही मृत्यू झाला.
संशयाची सुई कलिंगडावर? प्राथमिक अंदाजानुसार ही अन्नातून झालेली विषबाधा (Food Poisoning) असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः रात्री उशिरा खाल्लेले कलिंगड किंवा बिर्याणी यांपैकी कशामुळे ही विषबाधा झाली, याचा तपास पोलीस करत आहेत. कलिंगडामध्ये काही रासायनिक इंजेक्शन होते का किंवा अन्नात काही विषारी घटक मिसळला होता का, याचे सत्य पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच समोर येईल.
