मुंबईच्या गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये फिरताना आता अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आणि ‘लक्ष्मी निवास’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री स्वाती देवल हिला बोरिवलीमध्ये एका धक्कादायक अनुभवाचा सामना करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नेमकी घटना काय? स्वाती देवल मुंबईतील बोरिवली (पश्चिम) येथील प्रसिद्ध इंद्रप्रस्थ आणि मोक्ष प्लाझा परिसरात खरेदीसाठी गेली होती. तिथे गर्दीत असताना अचानक एक अंदाजे २८-३० वयोगटातील सुशिक्षित वाटणारी मुलगी तिच्याजवळ आली. तिने स्वातीला हिंदीत विचारले, “मॅम, मला तुमच्याशी बायबल विषयावर बोलायचे आहे. तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल का?”
स्वातीने प्रसंगावधान राखत त्वरित नकार दिला आणि ती तिथून पुढे निघून गेली. मात्र, त्या मुलीची वागणूक संशयास्पद वाटल्याने स्वातीने तिच्यावर लांबून लक्ष ठेवले. तेव्हा तिला धक्काच बसला. ती मुलगी आणि तिची अजून एक सोबतीण तिथे येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांना थांबवून त्यांच्याशी अशाच प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या दोघी आपसात काहीतरी संशयास्पद कुजबुजत होत्या.
अभिनेत्रीचे कळकळीचे आवाहन स्वातीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, “आपल्या अवतीभवती वाईट प्रवृत्तीची लोकं वावरत असतात, हे जोपर्यंत आपल्यासोबत घडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची झळ बसत नाही. या मुली खूप संशयास्पद वाटत होत्या. माझ्याकडून एक चूक झाली की मी त्यांचा व्हिडिओ शूट करू शकले नाही.” तिने पुढे असेही आवाहन केले की, “कोणाच्याही अशा बोलण्याला बळी पडू नका. आपल्या धर्माशी आणि विचारांशी एकनिष्ठ राहा. फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा.”
काही दिवसांपूर्वी अंधेरी रेल्वे स्थानकावरही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका वृद्धाकडून धर्मांतराचा प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आला होता. आता स्वाती देवलच्या या अनुभवामुळे मुंबईत अशा टोळ्या सक्रिय असल्याची भीती व्यक्त होत आहे.
