मुंबई: बॉलीवूडची ‘क्वीन’ अनुष्का शर्मा आज आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली तिला साथ देण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. आयपीएल २०२६ च्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत विराटने आपल्या लाडक्या पत्नीसाठी हे खास नियोजन केले आहे.
मैदानावरून थेट विमानतळावर! मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (३० एप्रिल) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असा सामना पार पडला. हा सामना संपल्यानंतर विराट विलंब न लावता मुंबईसाठी रवाना झाला. शुक्रवारी पहाटे तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी पापाराझींनी त्याला गराडा घातला, तेव्हा विराटनेही हसतमुखाने सर्वांना दाद दिली. जेव्हा फोटोग्राफर्सनी त्याला अनुष्काला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सांगितले, तेव्हा विराटनेही आनंदाने प्रतिसाद दिला.
कसा असेल सेलिब्रेशनचा प्लॅन? अनुष्का आणि विराट नेहमीच त्यांचे खाजगी आयुष्य साधेपणाने जगण्यावर भर देतात. यावेळीही अनुष्काचा ३८ वा वाढदिवस कुटुंब आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत साजरा होण्याची शक्यता आहे. विराट आणि अनुष्काचे नाते हे नेहमीच चाहत्यांसाठी प्रेरणादायी राहिले आहे. ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीला वामिका ही मुलगी आणि अकाय हा मुलगा अशी दोन गोंडस मुले आहेत.
काही दिवसांपूर्वीच हे जोडपे वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात दर्शनासाठी गेले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आजच्या या विशेष दिवशी विराट पुन्हा एकदा अनुष्कासाठी काय खास करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
