प्राजक्ता माळीने बदलले दागिन्यांच्या ब्रँडचे नाव; ‘प्राजक्तराज’ आता झाले ‘प्राजक्तसाज’!

प्राजक्ता माळीचा ज्वेलरी बिझनेसमध्ये मोठा बदल; कायदेशीर कारणांमुळे घेतला निर्णय.

Must read

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री, नृत्यांगना आणि यशस्वी उद्योजिका प्राजक्ता माळी सध्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे चर्चेत आहे. आपल्या अभिनय कौशल्याने आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या प्राजक्ताने तिच्या दागिन्यांच्या ब्रँडबाबत एक मोठा बदल केला आहे. तिचा लाडका ब्रँड ‘प्राजक्तराज’ आता नव्या रूपात आणि नव्या नावासह आपल्या भेटीला येणार आहे. या ब्रँडचे नवीन नाव ‘प्राजक्तसाज’ (Prajaktsaj) असे ठेवण्यात आले आहे.

नाव का बदलले?

प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या बदलामागचे कारण स्पष्ट केले आहे. ती म्हणाली की, जेव्हा तिने ३ वर्षांपूर्वी हा ब्रँड सुरू केला, तेव्हा व्यवसायातील तांत्रिक गोष्टींची तिला फारशी कल्पना नव्हती. केवळ महाराष्ट्राची दागिन्यांची परंपरा जिवंत ठेवण्याच्या भावनेतून तिने हे पाऊल उचलले होते. मात्र, जसा हा व्यवसाय मोठा झाला आणि सातासमुद्रापार पोहोचला, तसे ‘प्राजक्तराज’ या नावामुळे काही कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी (Technical & Legal hurdles) येऊ लागल्या. विशेषतः आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि व्यवसायाचा विस्तार करताना नाव अडथळा ठरत होते.

‘प्राजक्तसाज’ – महाराष्ट्राच्या परंपरेचा नवा साज

नवीन आर्थिक वर्षाच्या मुहूर्तावर (१ एप्रिलपासून) हा ब्रँड आता ‘प्राजक्तसाज’ या नावाने ओळखला जाईल. यासोबतच ‘Reviving Maharashtra’s Legacy’ ही टॅगलाईनही कायम असेल. प्राजक्ताने सांगितले की, लोगोमध्ये तिने स्वतःच्या हस्ताक्षरातील नावाचा वापर केला आहे. नाव बदलले असले तरी दागिन्यांची शुद्धता, महाराष्ट्राचा वारसा आणि ग्राहकांचे प्रेम हे तसेच राहील, अशी ग्वाही तिने चाहत्यांना दिली आहे.

महाराष्ट्रातील लोप पावत चाललेले पारंपरिक दागिने पुन्हा एकदा घराघरात पोहोचवण्यासाठी प्राजक्ताने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे तिचे चाहते कौतुक करत आहेत.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article