दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरातील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाचा झालेला दुर्दैवी मृत्यू सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या आठवड्यात आई, वडील आणि दोन चिमुरड्या मुली अशा चौघांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या कुटुंबाने रात्री कलिंगड खाल्ले होते आणि त्यानंतरच त्यांना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला, ज्यामुळे अनेकांनी ‘कलिंगडातून विषबाधा’ झाल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, आता या प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
FDA चा अहवाल काय सांगतो? घटनेनंतर पोलिसांनी तातडीने डोकाडिया कुटुंबाच्या घरातील अन्नाचे नमुने तपासणीसाठी ‘अन्न व औषध प्रशासनाकडे’ (FDA) पाठवले होते. नुकताच या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार, त्या रात्री खाल्लेल्या अर्धवट कलिंगडामध्ये कोणत्याही प्रकारचे विष किंवा घातक रसायन आढळलेले नाही. केवळ कलिंगडच नाही, तर घरातील बिर्याणी, पिण्याचे पाणी, कच्चे आणि शिजवलेले चिकन, खजूर आणि मसाले अशा एकूण ११ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी कोणत्याही खाद्यपदार्थात भेसळ किंवा विषारी अंश सापडलेले नाहीत.
मग मृत्यूचे कारण काय? कलिंगडात कृत्रिम रंग किंवा गोडव्यासाठी रसायनं नसल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. एकीकडे अन्न नमुने सुरक्षित असल्याचे समोर आले असताना, दुसरीकडे मृतांच्या फॉरेन्सिक रिपोर्टमधील माहिती मात्र चक्रावून टाकणारी आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृतांचे हृदय, मेंदू आणि आतडी यांसारखे अंतर्गत अवयव ‘हिरवट’ पडल्याचे दिसून आले आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सामान्य फूड पॉइजनिंगमध्ये अवयव असे हिरवे पडत नाहीत. जेव्हा शरीरात तीव्र विष पसरते, तेव्हाच अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे जर अन्नात विष नव्हते, तर या कुटुंबाच्या शरीरात विष गेले कसे? हा मोठा प्रश्न आता पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. आता सर्वांचे लक्ष सविस्तर फॉरेन्सिक रिपोर्ट आणि बॅक्टेरियल चाचण्यांच्या निकालाकडे लागले आहे, ज्यातून या मृत्यूंचे खरे कारण समोर येऊ शकेल.
