पुणे: बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी २०१९ मध्ये प्रस्थापित केलेला मताधिक्याचा विक्रम मोडीत काढत सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या विजयानंतर सुनेत्रा पवार अत्यंत भावूक झाल्या असून, त्यांनी हा विजय बारामतीकरांनी आपल्या लाडक्या ‘दादांना’ वाहिलेली ‘भावांजली’ असल्याचे म्हटले आहे.
विक्रमी मताधिक्य आणि राष्ट्रीय विक्रम या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना तब्बल २,१८,९३० मते मिळाली. त्यांच्या विरोधात रिंगणात असलेल्या २२ उमेदवारांपैकी एकालाही साधी शंभर मतेही पार करता आली नाहीत. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवारांचे हे मताधिक्य देशातील विधानसभा निवडणुकांच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य ठरले आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघातील सुनील कुमार शर्मा यांच्या नावावर (२,१४,८३४ मते) असलेला विक्रम सुनेत्रा पवार यांनी मोडीत काढला आहे.
“मन भरून येतंय…” – सुनेत्रा पवार विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, “अजित दादांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. मला कधीही वाटलं नव्हतं की अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल. आज बारामतीकरांनी जो विश्वास दाखवला आहे, तो दादांच्या विकासकामांची पोचपावती आहे. दादांनी बारामतीसाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन.”
जल्लोष नाही, तर केवळ सेवा या विजयानंतर पार्थ पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केले की, जरी हा विजय ऐतिहासिक असला तरी कुटुंबासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी हा आनंदाचा काळ नाही. त्यामुळे कोणताही जल्लोष न करता जनतेची सेवा करण्यावर भर दिला जाईल. आचारसंहिता संपल्यानंतर बारामतीत ‘जनता दरबार’ घेऊन लोकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
