देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) तीन राज्यांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. विशेषतः संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने अनपेक्षित कामगिरी करत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) १५ वर्षांच्या सत्तेला जोरदार धक्का दिला आहे. भाजपने बंगालमध्ये बहुमताचा आकडा पार केल्याचे चित्र स्पष्ट होताच देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
या विजयावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या आक्रमक नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राणा म्हणाल्या की, “आज ममता बॅनर्जींचा अहंकार पूर्णपणे तुटला आहे. ज्यांनी सनातन धर्म आणि भगव्याचा विरोध केला, त्यांच्यासोबत देशातील एकही राज्य उभं राहणार नाही. आज बंगालच्या जनतेने दाखवून दिलंय की अत्याचार करणाऱ्यांना जनता कधीच साथ देत नाही.”
‘खेला होबे’ नाही, आता ‘खेला खतम’! नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींच्या जुन्या घोषणेचा संदर्भ देत म्हटले की, “आता बंगालमध्ये ‘खेला होबे’ नाही, तर ममता दीदींचा ‘खेला खतम’ झाला आहे. पश्चिम बंगाल हे भारताचे महत्त्वाचे राज्य आहे आणि ते आपल्याकडेच राहिले पाहिजे, हीच जनतेची इच्छा होती. गृहमंत्री अमित शाह यांनी आखलेल्या अचूक रणनीतीमुळेच आज हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे.”
मुंबईत ‘रसगुल्ला’ पार्टी आणि जल्लोष: बंगालमधील या विजयाचा आनंद मुंबईतही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई भाजप कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळत आणि “जय श्री राम”च्या घोषणा देत विजयोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे, बंगालच्या विजयाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी हातात रसगुल्ल्याचे डबे घेऊन एकमेकांचे तोंड गोड केले. नगरसेविका हेतल गाला, प्रीती साटम आणि इतर महिला नेत्यांनी नाचत आणि गाणी गात आपला आनंद व्यक्त केला.
