नसरापूर अत्याचार प्रकरण: राज ठाकरेंचा सरकारवर प्रहार; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी

पुण्याच्या नसरापूर घटनेवर मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक; कायदा आणि सुव्यवस्थेवर उपस्थित केले गंभीर सवाल.

Must read

कायद्याचा धाक उरलाय कुठे?” – राज ठाकरेंचा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत जळजळीत भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, “साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लपवला जातो, हे ऐकूनच मनाचा थरकाप उडतो. अशा आरोपींना कायद्याचे काय होईल किंवा कोण काय म्हणेल याचा विचार न करता, सरकारने हालहाल करून संपवले पाहिजे.”

सरकारच्या ‘फास्टट्रॅक’ कारवाईवर टीका अशा घटना घडल्यानंतर सरकार नेहमीच ‘फास्टट्रॅक’ कोर्टात खटला चालवण्याचे आश्वासन देते. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “सरकारने आधी फास्टट्रॅकची व्याख्या स्पष्ट करावी. केवळ घटना घडल्यावर जाग येऊन उपयोग नाही. आज महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या शोषणाचे प्रमाण वर्षागणिक वाढत आहे, याचाच अर्थ गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही.”

आंदोलकांवरील लाठीमाराचा निषेध या घटनेनंतर नसरापूर परिसरात स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले होते. मात्र, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यावर संताप व्यक्त करताना राज ठाकरे यांनी विचारले की, “जी तत्परता सरकार आंदोलकांना झोडपण्यासाठी दाखवते, तीच तत्परता महिलांचे शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना रोखण्यासाठी का दाखवली जात नाही?”

महाराष्ट्राचे ‘लक्ष’ विचलित झाले आहे! राज ठाकरेंनी केवळ सरकारवरच नाही तर सध्याच्या समाजव्यवस्थेवरही भाष्य केले आहे. ते म्हणतात, “महाराष्ट्राचे लक्ष आणि लक्ष्य दोन्ही विचलित झाले आहे. सत्ता मिळवण्याच्या आणि गाजवण्याच्या नादात कोणालाच कोणाचा धाक उरलेला नाही. ओटीटीवरील कंटेंट, मोबाईलचे व्यसन आणि सत्तेची हाव यामुळे सामाजिक घडी विस्कटली आहे. जर आपण आजच यावर गांभीर्याने विचार केला नाही, तर भविष्यात आपला वाली कोणीच उरणार नाही.”

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article