बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. जान्हवी आणि तिचा ‘कथित’ बॉयफ्रेंड शिखर पहारिया यांच्या लग्नाच्या अफवांनी सध्या सोशल मीडियावर चांगलाच जोर धरला आहे. तिरुपती मंदिरातील जोडीने केलेले दर्शन असो किंवा विविध पार्ट्यांमधील त्यांची एकत्र उपस्थिती, या सगळ्यामुळे ही जोडी या वर्षाअखेरपर्यंत लग्न करणार अशा चर्चांना उधाण आले होते.
मात्र, या सर्व चर्चांवर आता जान्हवीचे वडील आणि प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला आहे.
लग्नाच्या चर्चांवर बोनी कपूर काय म्हणाले? एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बोलताना बोनी कपूर यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, “जान्हवी आणि शिखर खरोखरच यावर्षी लग्न करत आहेत का?” तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “नाही, या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे.” बोनी कपूर यांच्या या एका वाक्याने चाहत्यांच्या मनात असलेल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. सध्यातरी कपूर कुटुंबियांच्या घरात सनई-चौघडे वाजणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मैत्री ते प्रेम आणि बरंच काही… जान्हवी आणि शिखर हे दोघेही बालपणीचे मित्र आहेत. त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. २०१६ पासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या, पण २०१८ मध्ये जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर काही काळ ते एकमेकांपासून दुरावले होते. मात्र, २०२२ पासून ही जोडी पुन्हा एकदा अनेक ठिकाणी एकत्र दिसू लागली. कॉफी विथ करणच्या शोमध्येही जान्हवीने शिखरच्या नावाचा सूचक उल्लेख केला होता, ज्यामुळे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले होते.
सध्यातरी जान्हवी आपल्या आगामी सिनेमांच्या कामात व्यस्त असून, लग्नाचा कोणताही विचार नसल्याचे तिच्या कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
