सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. सुमारे ५० वर्षांच्या प्रदीर्घ बंदीनंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा परदेशात दारूची निर्यात सुरू केली आहे. इस्लामिक नियमांचा हवाला देत १९७७ मध्ये ज्या व्यवसायावर बंदी घालण्यात आली होती, तोच व्यवसाय आता पाकिस्तानची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मदतीचा हात देणार आहे.
कुठे होणार निर्यात? पाकिस्तानमधील प्रसिद्ध ‘मरी ब्रुअरी’ (Murree Brewery) या कंपनीने एप्रिल २०२६ मध्ये बिअर आणि इतर मद्यपेयांची पहिली खेप परदेशात रवाना केली आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्रिटन, जपान, पोर्तुगाल आणि थायलंड यांसारख्या बिगर-मुस्लिम देशांचा समावेश आहे. सध्या ही कंपनी या देशांमध्ये आपले वितरण जाळे (Network) मजबूत करण्यावर भर देत असून, आगामी काळात उत्पादनात मोठी वाढ करण्याची त्यांची योजना आहे.
५० वर्षांपूर्वी का लादली होती बंदी? १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या काळात पाकिस्तानात दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी देशात त्यांच्या विरोधात हिंसक आंदोलने सुरू होती आणि त्यांच्यावर ‘पाश्चात्य जीवनशैली’ स्वीकारल्याचा आरोप होत होता. राजकीय दबाव आणि धार्मिक संघटनांना शांत करण्यासाठी त्यांनी नाइट क्लब, बार आणि दारू विक्रीवर बंदी घातली. पुढे जनरल झिया उल हक यांनी सत्ता हाती घेतल्यावर हा कायदा अधिक कडक केला आणि तो इस्लामिक कायद्याशी जोडला.
आता निर्णयाची वेळ का आली? पाकिस्तानवर सध्या सुमारे १३८ अब्ज डॉलरचे प्रचंड परदेशी कर्ज आहे. देशाचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती आहे. सरकारी तिजोरीतील बराचसा पैसा केवळ कर्जाचे व्याज फेडण्यातच जात आहे. अशा परिस्थितीत, विदेशी चलन मिळवण्यासाठी सरकारने ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (OIC) मध्ये नसलेल्या देशांना दारू निर्यात करण्याची परवानगी दिली आहे.
इतिहास काय सांगतो? मजेशीर बाब म्हणजे, दक्षिण आशियात दारू गाळण्याची कला ५००० वर्षांपासून अस्तित्वात आहे. मोहेंजोदारोच्या उत्खननातही जगातील सर्वात जुने डिस्टिलरी अवशेष सापडले होते. पाकिस्तानमधील मरी ब्रुअरी ही कंपनी फाळणीपूर्वीपासून म्हणजेच १८६० पासून कार्यरत आहे. बंदीपूर्वी ही कंपनी भारत आणि अमेरिकेलाही दारू निर्यात करत असे. आता ५० वर्षांनंतर हा जुना व्यापार पुन्हा जिवंत करून पाकिस्तान आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
