आयपीएलचा फिव्हर सध्या देशभर पसरला असून, चाहत्यांमध्ये आपल्या लाडक्या खेळाडूंना मैदानात पाहण्याची प्रचंड ओढ निर्माण झाली आहे. विशेषतः जिथे विराट कोहली खेळायला जातो, तिथे प्रेक्षकांची तुफान गर्दी होणे हे जणू समीकरणच बनले आहे. याचाच प्रत्यय आता लखनौमध्ये येत आहे. लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणाऱ्या आगामी सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
तिकिटांसाठी चाहत्यांची झुंबड विराट कोहलीला प्रत्यक्ष खेळताना पाहण्यासाठी लखनौचे चाहते कोणत्याही थराला जायला तयार आहेत. या प्रचंड मागणीमुळे तिकिटांच्या किमतींनी आकाशाला गवसणी घातली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या हाय-व्होल्टेज सामन्याच्या एका तिकिटाचा दर तब्बल ५०,००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सामान्यतः उपलब्ध असणारी तिकिटे काही मिनिटांतच विकली गेल्याने, आता महागड्या श्रेणीतील तिकिटांसाठीही चढाओढ सुरू आहे.
विराट कोहलीची क्रेझ हा सामना केवळ दोन संघांमधील लढत नसून, तो विराट कोहली विरुद्ध लखनौ असा रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. मैदानातील सुरक्षा व्यवस्था आणि वाढती गर्दी पाहता प्रशासनानेही विशेष तयारी केली आहे. ‘कोहली… कोहली…’ अशा घोषणांनी लखनौचे इकाना स्टेडियम दुमदुमणार असून, या ‘कोहली मॅनिया’मुळे तिकिटांचा काळाबाजार होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. खिशाला कात्री लागूनही आपल्या लाडक्या ‘किंग’चा खेळ पाहण्यासाठी चाहते सज्ज झाले आहेत.
