तामिळनाडूत इंडिया आघाडीला धक्का; द्रमुक-काँग्रेस युती तुटली, कनिमोळींची लोकसभेत वेगळ्या बैठकीची मागणी.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर द्रमुकचा मोठा निर्णय; थलपती विजय यांच्या टीव्हीकेला काँग्रेसने पाठिंबा दिल्याने द्रमुक नाराज.

Must read

तामिळनाडूच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘इंडिया’ आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या द्रमुक (DMK) आणि काँग्रेसमधील युती संपुष्टात आली आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर या दोन्ही पक्षांमधील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. याचे थेट पडसाद आता दिल्लीच्या राजकारणातही उमटताना दिसत आहेत.

नेमके प्रकरण काय? तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुक आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकला मोठा धक्का बसला. खुद्द स्टॅलिन यांचाही पराभव झाला. धक्कादायक बाब म्हणजे, निवडणुकीनंतर काँग्रेसनं आपली भूमिका बदलत दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसच्या या ‘हातमिळवणी’मुळे द्रमुक प्रचंड नाराज झाला असून त्यांनी काँग्रेससोबतची वर्षानुवर्षांची मैत्री तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कनिमोळींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र या बदलत्या राजकीय समीकरणांमुळे द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र धाडले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे काँग्रेससोबतची आमची आघाडी आता अधिकृतपणे संपली आहे. त्यामुळे लोकसभेत द्रमुकच्या खासदारांची बसण्याची व्यवस्था काँग्रेसपासून वेगळी करण्यात यावी. आता आम्हाला काँग्रेसच्या बाकांवर एकत्र बसणे शक्य नाही, अशी ठाम भूमिका द्रमुकने घेतली आहे.

तामिळनाडू विधानसभेचे चित्र तामिळनाडूत सध्या कोणाचेही स्पष्ट बहुमत नसल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. थलपती विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाने १०८ जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधले आहे, तर द्रमुकला केवळ ५९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पाठिंब्यामुळे आता विजय यांच्या सत्तेच्या वाटा सुकर होताना दिसत आहेत, ज्यामुळे द्रमुक एकाकी पडल्याचे चित्र आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article