क्रूझवर हंताव्हायरसचा हाहाकार; ३ मृत्यू, २ भारतीय अडकले

अटलांटिक महासागरातील MV होंडियस जहाजावर जीवघेण्या व्हायरसचा उद्रेक.

Must read

जग अद्याप कोरोनाच्या आठवणींतून सावरत असतानाच, आता ‘हंताव्हायरस’ नावाच्या एका नव्या संकटाने डोके वर काढले आहे. अटलांटिक महासागराच्या निळ्याशार लाटांवरून प्रवास करणाऱ्या ‘MV होंडियस’ (MV Hondius) या आलिशान क्रूझ शिपवर या जीवघेण्या व्हायरसने शिरकाव केला आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण बाधित झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

हे जहाज १ एप्रिल रोजी अर्जेंटिनाच्या उशुआइया येथून निघाले होते. या प्रवासात २८ देशांतील एकूण १५० प्रवासी आणि क्रू सदस्य सहभागी होते. सुरुवातीला एका डच पर्यटकाचा मृत्यू झाला, त्यानंतर त्याच्या पत्नीचा आणि एका जर्मन महिलेचाही या विषाणूमुळे बळी गेला. या घटनेने जहाजावर भीतीचे वातावरण पसरले आहे.

भारताची चिंता का वाढली?

या क्रूझवर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन भारतीय सदस्यांचा समावेश आहे. सध्या हे जहाज आफ्रिकेजवळील केप वर्दे बेटांजवळ उभे आहे. संसर्ग पसरू नये म्हणून स्थानिक प्रशासनाने कोणालाही जमिनीवर उतरण्यास परवानगी नाकारली आहे. दोन भारतीय सदस्य सध्या जहाजावरच असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Shutterstock

काय आहे हा ‘हंताव्हायरस’?

तज्ज्ञांच्या मते, हंताव्हायरस हा प्रामुख्याने उंदीर आणि घुशींच्या विष्ठेमुळे किंवा लाळेतून पसरतो. विशेष म्हणजे, हा विषाणू एका मानवाकडून दुसऱ्या मानवाकडे पसरण्याचे प्रमाण खूप कमी असते, मात्र या क्रूझवरील घटनेने जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) सतर्क केले आहे. हा विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करतो आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण करतो.

सध्या हे जहाज स्पेनच्या कॅनरी बेटांच्या दिशेने रवाना झाले असून, तिथे सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article