नेमकं प्रकरण काय होतं? एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली. अक्षय खन्ना आणि चित्रपटातील मुख्य कलाकार एका आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्यास होते, तर चित्रपटातील छोटे सहकलाकार दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबले होते. एके दिवशी, एक सहकलाकार दुपारच्या जेवणासाठी मुख्य टीम असलेल्या हॉटेलमध्ये आला. त्याने जेवणाचे ताट हातात घेतले आणि तो पहिला घास घेणार इतक्यात तिथे गोंधळ झाला.
प्रोडक्शन टीममधील एका सदस्याने, जो निर्मात्याचा जवळचा नातेवाईक होता, त्याने त्या सहकलाकाराला सर्वांसमोर अडवले. “तुम्ही हे जेवण घेऊ शकत नाही, कारण तुम्ही इथले पाहुणे नाही आहात,” असे म्हणत त्याने त्या कलाकाराचा अपमान केला. तो सहकलाकार अत्यंत अपमानित झाला आणि त्याने मुकाट्याने ताट बाजूला ठेवून तो कोपऱ्यात जाऊन बसला.
अक्षय खन्नाचा ‘रुद्र’ अवतार अक्षय खन्ना हे सर्व लांबून पाहत होता. सहसा कोणत्याही वादात न पडणाऱ्या अक्षयचा हा अपमान पाहून पारा चढला. त्याने थेट निर्मात्याला गाठले आणि सर्वांसमोर त्याची खरडपट्टी काढली. अक्षय म्हणाला, “कोणताही चित्रपट तुमच्याकडे किती ताटं आहेत किंवा तुम्ही किती जेवण वाढता यावर बनत नाही, तर तो लोकांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या मेहनतीने यशस्वी होतो.”
अक्षयच्या या तिखट उत्तराने निर्मात्याची बोलतीच बंद झाली. एका छोट्या कलाकारासाठी अक्षय ज्या पद्धतीने उभा राहिला, त्यावरून त्याने केवळ त्या कलाकाराचे मन जिंकले नाही, तर सेटवर माणुसकीचे दर्शनही घडवले.
