हैदराबाद: दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी बातमी समोर आली आहे. उदयोन्मुख अभिनेता भरत कांत (Bharath Kanth) आणि प्रतिभावान सिनेमॅटोग्राफर जी. साई त्रिलोक (Sai Trilok) यांचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कसा झाला अपघात? मिळालेल्या माहितीनुसार, भरत कांत आणि साई त्रिलोक हे त्यांच्या कारने प्रवास करत होते. वाटेत त्यांच्या कारची एका उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आहे. धडक बसल्यानंतर दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना नेल्लोर जिल्ह्यातील कावळी शहराजवळ घडली.
करिअरच्या शिखरावर असताना काळाचा घाला भरत कांत हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक आश्वासक चेहरा होता. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘टेनंट’ (Tenant) या चित्रपटामुळे तो चर्चेत आला होता. आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकण्यास सुरुवात केली होती. दुसरीकडे, साई त्रिलोक हा एक उत्तम सिनेमॅटोग्राफर म्हणून ओळखला जात होता. या दोघांच्या जाण्याने फिल्म इंडस्ट्रीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या अपघातात कारचे झालेले नुकसान पाहून धडकेची तीव्रता किती मोठी असेल याचा अंदाज येतो. या घटनेमुळे सोशल मीडियावर त्यांचे सहकारी आणि चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
