मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या खळबळजनक हत्येनंतर आता पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या घटनेवेळी सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस हवालदार श्याम सोनावणे यांना अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ (Dismissed) करण्यात आले आहे. कर्तव्यात दाखवलेला निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
काय घडलं होतं ‘त्या’ रात्री? १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसऱ्याच्या रात्री वांद्रे पूर्व भागात बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्दीकी यांना ‘२+१’ अशा स्वरूपाची पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र, ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा दोन रक्षक ड्युटीवरून गेले होते आणि केवळ श्याम सोनावणे हेच त्यांच्यासोबत उपस्थित होते.
हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या तेव्हा सोनावणे यांनी त्यांना रोखण्यासाठी कोणताही प्रतिकार केला नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. चौकशीदरम्यान सोनावणे यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, “परिसरात फटाक्यांची आतिशबाजी आणि मिरवणुकांचा आवाज असल्याने आपल्याला गोळीबाराचा अंदाज आला नाही.” मात्र, पोलीस तपासात त्यांचे हे स्पष्टीकरण समाधानकारक आढळले नाही.
दीर्घ चौकशीनंतर कारवाईचा बडगा या घटनेनंतर तातडीने सोनावणे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू झाली. १८ महिने चाललेल्या या प्रक्रियेनंतर, मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाने त्यांना दोषी ठरवले. ३० एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या बडतर्फीचा अधिकृत आदेश काढण्यात आला आणि २ मे रोजी त्यांनी तो स्वीकारला. यामुळे सोनावणे यांची पोलीस दलातील कारकीर्द आता कायमची संपुष्टात आली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास अद्यापही सुरू असून, गँगस्टर अनमोल बिश्नोईचे नाव यात प्रामुख्याने समोर आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात २७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, सुरक्षारक्षकाची ही एका वेळेची चूक संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या घटनेस कारणीभूत ठरली, हेच या कारवाईतून स्पष्ट होत आहे.
