नवी दिल्ली: वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट’ (NEET UG 2026) परीक्षा केंद्र सरकारने अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मे २०२६ रोजी देशभरात पार पडलेली ही परीक्षा आता नव्याने घेतली जाणार आहे. पेपरफुटीच्या गंभीर आरोपांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या संतापामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
नेमकं प्रकरण काय? यंदा ३ मे रोजी देशभरातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. यामध्ये महाराष्ट्रातील अडीच लाख विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र, परीक्षा होण्याच्या तब्बल ४२ तास आधीच या परीक्षेची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर आणि काही ठराविक दलालांकडे उपलब्ध झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. सुरुवातीला नकार देणाऱ्या प्रशासनाने अखेर पुराव्यांची दखल घेत ही परीक्षा रद्द करण्याचे जाहीर केले आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा ‘खेळ’ लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार यांच्या मते, “एका ‘गेस पेपर’मधील १३१ प्रश्न जसेच्या तसे मुख्य परीक्षेत येणे, हा योगायोग नसून मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे. दलालांच्या फायद्यासाठी लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवणे चुकीचे आहे.”
आता पुढे काय? ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यांना आता पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. परीक्षेच्या नवीन तारखा नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून लवकरच अधिकृतपणे जाहीर केल्या जातील. परीक्षेचा निकाल आणि प्रवेश प्रक्रियेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
