दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणामुळे चर्चेत आहे. मात्र, ही चर्चा तिच्या कामाचे कौतुक करण्यासाठी नसून, एका वेगळ्याच चिंतेमुळे होत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला साई पल्लवी आणि आमिर खानचा मुलगा जुनैद खान यांचा ‘एक दिन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. पण या चित्रपटाच्या अपयशापेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे साई पल्लवीच्या हिंदी उच्चारांची.
साई पल्लवीचे हिंदी भाषेतील उच्चार स्पष्ट नसल्याने सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. ‘एक दिन’ चित्रपटात तिचे संवाद ऐकल्यानंतर प्रेक्षकांनी तिच्या भाषेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आता हीच बाब नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
निर्माते घेणार मोठा निर्णय? ‘रामायण’ हा एक भव्य चित्रपट असून यात साई पल्लवी ‘माता सीतेची’ अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सीतेच्या पात्रासाठी भाषेची शुद्धता आणि शब्दांचे उच्चार अतिशय महत्त्वाचे मानले जातात. ‘एक दिन’मधील तिच्या हिंदी उच्चारांवरून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे, ‘रामायण’चे निर्माते आता साई पल्लवीचा आवाज डब (Dubing) करण्याचा विचार करत आहेत. चित्रपट अधिक अस्सल वाटावा आणि प्रेक्षकांना संवादांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी निर्माते दुसरा प्रोफेशनल आवाज वापरण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे निर्मात्यांना कोणतीही जोखीम पत्करायची नाहीये. साई पल्लवीने याआधी आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत, पण हिंदी भाषेवरील पकड कमी असल्याने आता तिला डबिंगचा आधार घ्यावा लागण्याची शक्यता आहे.
