रत्नागिरीतील साईनगर भागात सूरज झोरेची निर्घृण हत्या, तर नागपुरात ४८ तासांत ३ हत्येच्या घटनांमुळे खळबळ.

Must read

कोकणातील शांत समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी शहरात एका थरारक आणि मन सुन्न करणाऱ्या गुन्हेगारी घटनेने खळबळ उडवून दिली आहे. रत्नागिरी शहरानजीक असलेल्या कुवारबाव येथील साईनगर भागात एका २५ वर्षीय तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सूरज राजाराम झोरे असे या मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यावर भरचौकात कोयत्याने सपासप वार करण्यात आले. दरम्यान, मृत्यूशी झुंज देत असतानाचा सूरजचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मदतीसाठी पुढे आलेल्या लोकांचे आभार मानताना आणि मारेकऱ्यांची नावे सांगताना दिसत आहे.

मित्रांमधील वाद विकोपाला आणि… सूरज झोरे हा मूळचा संगमेश्वर तालुक्यातील नायरी गावचा रहिवासी होता, परंतु सध्या तो कामानिमित्त मुंबईतील विरार भागात राहत होता. काही वैयक्तिक कामासाठी तो रत्नागिरीत आला होता. गुरुवारी (२१ मे) रात्री ९.३० ते ११ च्या सुमारास साईनगर येथील रेल्वे ट्रॅकच्या मागे सूरज आणि त्याचे काही मित्र एकत्र जमले होते. सुरुवातीला गप्पांमधून सुरू झालेल्या एका विषयावरील वादाचे रूपांतर अचानक हाणामारीत झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी जवळ असलेला धारदार कोयता काढून सूरजच्या मानेवर आणि हातांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली.

मदतीसाठी दार ठोठावले, पण भीतीपोटी दरवाजा उघडला नाही! रक्ताने माखलेला सूरज मारेकऱ्यांच्या तावडीतून कसाबसा सुटला आणि जीव वाचवण्यासाठी पळत सुटला. जवळच असलेल्या एका घराचा दरवाजा त्याने मोठ्या आशेने ठोठावला. घरात उपस्थित व्यक्तीने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण तितक्यात हातात रक्ताळलेला कोयता घेतलेले मारेकरी तिथे पोहोचले. त्यांनी घरातील लोकांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. घरात महिला आणि लहान मुले असल्याने भीतीपोटी कोणीही दरवाजा उघडण्याचे धाडस करू शकले नाही. अखेर मारेकरी तिथून पसार झाल्यानंतर, स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी सूरजला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान मृत्यू आणि आरोपींना अटक रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) सूरजवर उपचार सुरू होते. मात्र, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे अखेर शुक्रवारी (२२ मे) दुपारी २.३० च्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. मृत्यूच्या काही वेळ आधी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सूरज अत्यंत गंभीर परिस्थितीतही त्याला मदत करणाऱ्यांचे आभार मानताना दिसला. सूरजची बहीण नंदा रमेश फाले (रा. दहिसर, मुंबई) हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड आणि नजीबूल शेख उर्फ सोनू या तिन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

२. नागपुरात गुन्हेगारीचा आलेख वाढला; अवघ्या ४८ तासांत ३ भीषण हत्या

एकीकडे रत्नागिरीतील घटनेने कोकण हादरले असतानाच, राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. नागपुरात अवघ्या ४८ तासांच्या आत हत्येच्या ३ वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत.

  • नातवानेच घेतला आजीचा जीव: पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. आरोपी नातू राज बागडे याने आजी इंदुबाई चव्हाण यांच्या एटीएममधून त्यांना न सांगता पैसे काढले होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाच्या रागातून दारूच्या नशेत राजने पोटच्या आजीचा गळा आवळून खून केला.

  • मजुराची अज्ञात व्यक्तींकडून हत्या: दुसरी घटना नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली, जिथे एका संजय ठाकूर नावाच्या मजुराची अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या केली.

  • भावानेच केली भावाची हत्या: तिसरी घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. किरकोळ कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच आपल्या भावाचा जीव घेतल्याचे समोर आले आहे.

या दोन्ही शहरांमधील लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article