अंबरनाथ: आई अन् भावांनी केला बहिणीचा विश्वासघात; वडिलांच्या निधनानंतर बनावट मृत्यूपत्र बनवून हडपली मालमत्ता!

वडिलांच्या मृत्यूनंतर ३ महिन्यांनी खरेदी केलेल्या स्टॅम्प पेपरवर केली खोटी सही; RTI मुळे बहिणीने उघड केला कुटुंबाचाच कारस्थान.

Must read

अंबरनाथ: रक्ताच्या नात्यात जेव्हा पैशाची हाव शिरते, तेव्हा माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय अंबरनाथमध्ये आला आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर डोळा ठेवून, सख्ख्या आईने आणि दोन भावांनी मिळून आपल्याच बहिणीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नेमके प्रकरण काय? अंबरनाथमधील भाजपचे दिवंगत नेते गुलाबराव करंजुले यांचे बंधू आनंदराव करंजुले यांचे ६ जुलै २०२३ रोजी निधन झाले. आनंदराव यांच्या नावावर अंबरनाथ आणि अहमदनगरमध्ये कोट्यवधींची मालमत्ता, दुकाने आणि घरे आहेत. वडिलांच्या निधनानंतर ही मालमत्ता वारसांच्या नावे करण्यासाठी बँकेकडून वारंवार पत्रे येत होती. आनंदराव यांची कन्या अर्चना करंजुले यांनी आपल्या भावांकडे (प्रशांत आणि संतोष करंजुले) वारस दाखल्यासाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र, भावांनी तिला प्रतिसाद देण्याऐवजी संवादच तोडून टाकला.

बनावट मृत्यूपत्राचा बनाव: अर्चना यांना कोणतीही कल्पना न देता, त्यांच्या आईने आणि भावांनी न्यायालयात वारस दाखल्यासाठी अर्ज केला. यावेळी त्यांनी १२ ऑक्टोबर २०२२ रोजीचे एक मृत्यूपत्र सादर केले. या मृत्यूपत्रानुसार अर्चना यांना वडिलांच्या सर्व मालमत्तेतून पूर्णपणे बेदखल करण्यात आले होते. मात्र, त्यावरील वडिलांची सही पाहून अर्चना यांना संशय आला.

माहिती अधिकारातून (RTI) सत्य बाहेर: अर्चना यांनी हार न मानता माहिती अधिकारांतर्गत मुद्रांक कार्यालयातून त्या स्टॅम्प पेपरची माहिती काढली. तेव्हा अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. ज्या स्टॅम्प पेपरवर १२ ऑक्टोबर २०२२ रोजी वडिलांनी सही केल्याचा दावा केला होता, तो स्टॅम्प पेपर प्रत्यक्षात १६ ऑक्टोबर २०२३ रोजी (वडिलांच्या मृत्यूनंतर ३ महिन्यांनी) विक्री झाला होता. म्हणजेच वडिलांच्या मृत्यूनंतर वर्षभरानी हा कागद अस्तित्वात आला होता, मग त्यावर वडिलांची सही कशी असू शकते? या एका प्रश्नाने संपूर्ण घोटाळा उघड केला.

पोलिसांची टाळाटाळ आणि अखेर गुन्हा दाखल: सुरुवातीला अंबरनाथमधील राजकीय दबावामुळे पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. “आरोपी आमचे मित्र आहेत,” अशी उत्तरेही त्यांना मिळाली. शेवटी अर्चना यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. कल्याण झोन ३ चे डीसीपी अतुल झेंडे यांच्या आदेशानंतर चौकशी झाली आणि कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आई सुनंदा करंजुले, भाऊ प्रशांत आणि संतोष करंजुले, तसेच दोन साक्षीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article