२०१५ मध्ये जेव्हा दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद’ चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. विज्ञानाची कास धरणारा शास्त्रज्ञ राघव शास्त्री आणि श्रद्धेची ताकद सांगणारे स्वामी समर्थ यांच्यातील संवाद प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या चित्रपटात राघव शास्त्रींच्या गोड आणि खोडकर मुलीची भूमिका एका चिमुरडीने साकारली होती. तिचे नाव आर्या घारे. आज तब्बल ११ वर्षांनंतर आर्या इतकी बदलली आहे की तिला ओळखणंही कठीण झालं आहे.
आर्या घारेचा थक्क करणारा बदल (Transformation) ‘देऊळ बंद’मध्ये ‘सना’ हे पात्र साकारणारी आर्या त्यावेळी केवळ ७-८ वर्षांची होती. शास्त्रज्ञ बाबांच्या कम्प्युटरचा पासवर्ड बदलणारी ती निरागस मुलगी आता मोठी झाली असून तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आर्या आता प्रचंड सुंदर आणि स्टायलिश दिसते. तिने आपल्या अभिनयाचा प्रवास केवळ ‘देऊळ बंद’पुरता मर्यादित न ठेवता ‘ग्रेट माय इंडिया’, ‘बंदीशाळा’, ‘अ ब क’ यांसारख्या चित्रपटांतून आणि ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतूनही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
‘देऊळ बंद २’ मध्ये आर्या दिसणार का? अक्कलकोटच्या स्वामी मंदिरात नुकताच ‘देऊळ बंद २’ चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला. यानंतर आर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. मात्र, तिने एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तरही दिले आहे. आर्याने स्पष्ट केले की, ती ‘देऊळ बंद २’ मध्ये दिसणार नाहीये. जरी ती या भागात नसली, तरी ‘देऊळ बंद’ हा तिचा पहिला प्रकल्प आणि तिची ओळख असल्याने या चित्रपटाशी तिचं खास नातं असल्याचं तिने भावूक होत सांगितलं.
मोठ्या पडद्यावर स्वामींच्या भूमिकेत पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी दर्शन देणार आहेत, तर प्रमुख भूमिकेत स्नेहल तरडे दिसणार आहेत. आर्या जरी या भागात नसली, तरी तिचे सध्याचे फोटो पाहून चाहते तिच्या आगामी प्रकल्पांसाठी उत्सुक आहेत.
