डोंबिवली: माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. एका अनाथ तरुणीला आधी तिच्या मैत्रिणीच्या पालकांनी मारहाण केली आणि त्यानंतर या संकटातून वाचवण्यासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या स्नॅपचॅटवरील मित्रानेच तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित तरुणी डोंबिवलीत एका खाजगी कंपनीत काम करते. ती अनाथ असून तिला कोणाचेही पाठबळ नाही. काही दिवसांपूर्वी एका क्षुल्लक कारणावरून तिच्या मैत्रिणीच्या वडिलांनी तिला बेदम मारहाण केली होती. या अनपेक्षित हल्ल्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. तिला या विरोधात पोलिसांत दाद मागायची होती, मात्र तिला सोबत करण्यासाठी कोणीही नव्हते.
अशातच तिने आपली व्यथा स्नॅपचॅट (Snapchat) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झालेल्या क्रिश भोईर नावाच्या तरुणाला सांगितली. मदतीचे आश्वासन देत क्रिशने तिला भेटायला बोलावले. आपल्याला पोलिसांकडे नेईल या आशेने ही तरुणी त्याच्याकडे गेली. मात्र, क्रिशचे इरादे वेगळेच होते.
मदतीच्या बहाण्याने नराधमाचा घात
क्रिशने तिला पोलीस स्टेशनला नेण्याऐवजी एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे तिच्या असहायतेचा फायदा घेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही; त्याने तरुणीला धमकावत तिच्या ‘जी-पे’ (GPay) वरून पैसे ट्रान्सफर केले, तिचा मोबाईल चोरला आणि तिला तिथेच सोडून पळ काढला.
आमदार राजेश मोरे यांच्या मदतीने आरोपी अटकेत
या भीषण संकटातून सुटल्यावर पीडित तरुणीने हिंमत न हारता डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखा गाठली. तिथे तिने आमदार राजेश मोरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. घटनेचे गांभीर्य ओळखून आमदारांनी तात्काळ शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पीडितेसोबत मानपाडा पोलीस ठाण्यात पाठवले. मानपाडा पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत अवघ्या एका तासाच्या आत आरोपी क्रिश भोईरला बेड्या ठोकल्या.
