राजकारणातील ‘भीष्मपितामह’ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आता पूर्णपणे बरे झाले असून, त्यांनी पुन्हा एकदा जनसागरात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही काळ विश्रांती घेतल्यानंतर, पवारांनी आपल्या पुनरागमनासाठी क्रांतीकारी सातारा जिल्ह्याची निवड केली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा हा दौरा केवळ शैक्षणिक सोहळा नसून त्याला मोठे राजकीय महत्त्वही प्राप्त झाले आहे.
नेमका काय आहे दौरा? राज्यसभा खासदारकीची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. अगदी बारामती विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळीही ते उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र, आता पूर्ण ताकदीने सावरल्यानंतर ते ८ मे रोजी साताऱ्यात दाखल होतील. ९ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतील.
साताऱ्याचे भावनिक आणि राजकीय नातं शरद पवार आणि सातारा जिल्हा यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. मग तो भर पावसात गाजलेला साताऱ्याचा सभा असो किंवा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा सांगणारे येथील राजकारण असो. साताऱ्याने नेहमीच पवारांना साथ दिली आहे. या दौऱ्यात पवार साताऱ्यात मुक्कामी असणार असून, रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थान भूषवतील. यावेळी त्यांच्या हस्ते विविध गुणवंत शिक्षकांचा आणि रयत सेवकांचा ‘यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने गौरव केला जाणार आहे.
भाषणाकडे सर्वांचे लक्ष केवळ साताराच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष शरद पवार या दौऱ्यात काय बोलणार याकडे लागले आहे. आजारपणानंतरच्या पहिल्याच सार्वजनिक भाषणातून ते कोणती राजकीय दिशा स्पष्ट करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. साताऱ्याच्या भूमीत पवारांचे येणे हे कार्यकर्त्यांसाठी नवचैतन्य देणारे ठरणार आहे.
