इराकच्या वाळवंटात इस्रायलचा गुप्त तळ; एका मेंढपाळाने उघड केलं धक्कादायक गुपित!

इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायलने इराकमध्ये उभारले होते लष्करी तळ; हेलिकॉप्टरने पाठलाग करून मेंढपाळाला मारले.

Must read

आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि युद्धभूमीवर कधी काय घडेल याचा नेम नसतो. सध्या मध्यपूर्वेत (Middle East) असाच एक धक्कादायक खुलासा झाला आहे, ज्याने जगभरातील गुप्तहेर यंत्रणांचे कान टोकारले आहेत. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षादरम्यान, इस्रायलने चक्क शेजारील देश इराकच्या हद्दीत शिरून तिथे आपले ‘गुप्त लष्करी तळ’ उभारल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पण सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कोट्यवधी रुपयांच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला हा गुप्त तळ कोणत्याही सॅटेलाईट किंवा रडारमुळे नाही, तर वाळवंटात भटकणाऱ्या एका साध्या मेंढपाळामुळे जगासमोर आला!

वाळवंटातील गुपित आणि तो मेंढपाळ… ही गोष्ट आहे इराकच्या पश्चिमेकडील नजफ आणि अल-नुखैब वाळवंटातील. मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवध अल-शम्मारी नावाचा २९ वर्षांचा एक स्थानिक मेंढपाळ आपल्या गाडीतून सामानाची खरेदी करण्यासाठी निघाला होता. वाळवंटाच्या एका निर्जन भागात अचानक त्याला काही सैनिकांची हालचाल, हेलिकॉप्टर्स आणि तंबू ठोकलेली एक धावपट्टी (Air Strip) दिसली. एका अत्यंत दुर्गम भागात अशा प्रकारची लष्करी यंत्रणा पाहून अवध चक्रावला. त्याने तात्काळ या संशयास्पद हालचालींची माहिती इराकच्या प्रादेशिक लष्करी कमांडला दिली.

कॉप्टरने केला थरारक पाठलाग! पण अवधला हे ठाऊक नव्हतं की त्याने इस्रायलच्या सर्वात मोठ्या गुपितावर हात ठेवला आहे. त्याने माहिती दिल्याचे समजताच, तिथून एका हेलिकॉप्टरने त्याच्या पिकअप ट्रकचा वाळवंटात थरारक पाठलाग सुरू केला. अवधने जीव वाचवण्यासाठी गाडी वेगाने पळवली, पण हेलिकॉप्टरमधून त्याच्या गाडीवर बेछूट गोळीबार करण्यात आला आणि त्यातच या निष्पाप मेंढपाळाचा अंत झाला.

इराकी लष्करावरही झाला हल्ला अवधच्या माहितीनंतर जेव्हा इराकी सुरक्षा दलाचे जवान हुमवी गाड्यांमधून तपास करण्यासाठी त्या भागात पोहोचले, तेव्हा पहाटेच्या अंधारात त्यांच्यावरही भीषण हवाई हल्ला झाला. या चकमकीत इराकचा एक सैनिक ठार झाला तर दोन जण जखमी झाले. हल्ल्यानंतर जेव्हा इराकी कमांडोने त्या जागेची तपासणी केली, तेव्हा तिथे अत्यंत आधुनिक रडार यंत्रणा आणि परदेशी लष्कराने वापरलेले साहित्य आढळून आले.

इस्रायलने इराकमध्ये तळ का बनवला होता? द वॉल स्ट्रीट जर्नल आणि न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, इस्रायलने इराणवर हवाई हल्ले करण्यासाठी इराकच्या वाळवंटात कमीत कमी दोन गुप्त तळ उभारले होते. इराण हा इस्रायलपासून तब्बल १००० मैल दूर आहे. एवढ्या लांब अंतरावर विमानांना इंधन भरणे, जखमी वैमानिकांना वैद्यकीय मदत देणे आणि आपत्कालीन स्थितीत वैमानिकांची सुटका करणे (Search-and-Rescue) यासाठी इस्रायलला एका जवळच्या तळाची गरज होती. म्हणूनच त्यांनी इराकच्या वाळवंटाची निवड केली होती.

अमेरिकेने इराकपासून हे गुपित का लपवले? या संपूर्ण प्रकरणात अमेरिका देखील संशयाच्या भोऱ्यात आहे. वास्तविक पाहता, अमेरिका आणि इराक यांच्यातील करारानुसार अमेरिकेला इराकमधील प्रत्येक लष्करी हालचालीची माहिती इराकी सरकारला देणे बंधनकारक आहे. परंतु, अमेरिकेला जून २०२५ पासूनच इस्रायलच्या या गुप्त तळाची माहिती होती, तरीही त्यांनी आपल्या मित्रदेशाला (इराक) याबद्दल अंधारात ठेवले. एवढेच नाही तर, अमेरिकेने आपल्या विमानांच्या सुरक्षेचे कारण सांगून इराकची रडार यंत्रणा काही काळासाठी बंद करायला लावली होती, जेणेकरून इस्रायलची विमाने इराकमध्ये सहज ये-जा करू शकतील.

या खुलाशामुळे आता इराकच्या सार्वभौमत्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण मध्यपूर्वेतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article