बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ ही मालिका आजही भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील एक सुवर्णपान मानली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. यात पांडवांची माता ‘कुंती’ ही भूमिका साकारली होती अभिनेत्री नाजनीन यांनी. एक मुस्लिम अभिनेत्री असूनही त्यांनी कुंतीच्या पात्रात जो जिवंतपणा आणला, त्यासाठी त्यांचे आजही कौतुक होते. मात्र, यशाच्या शिखरावर असताना घेतलेल्या एका निर्णयाने त्यांचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त केले.
जया बच्चन यांची ‘कार्बन कॉपी’ नाजनीन यांचा चेहरा हुबेहूब दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांच्यासारखा होता. याच साम्यामुळे त्यांना सिनेसृष्टीत ओळख मिळाली, पण हेच साम्य त्यांच्यासाठी अडथळाही ठरले. अनेक दिग्दर्शकांनी त्यांना फक्त ‘जया बच्चन यांची बहीण’ किंवा नायिकेची मैत्रीण अशा दुय्यम भूमिकांसाठीच विचारले. ‘सा रे गा मा पा’ या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले, पण त्यांना कधीही मुख्य नायिकेची संधी मिळाली नाही.
महाभारताने दिले वेगळे वलय चित्रपटात साचेबद्ध भूमिका मिळत असतानाच त्यांना बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये कुंतीची भूमिका मिळाली. या भूमिकेने त्यांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली. घरोघरी कुंती माता म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. त्यांच्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांचे डोळे पाणावले.
करिअरला कलाटणी देणारा तो ‘चुकीचा’ निर्णय महाभारतानंतर नाजनीन यांना मोठ्या पडद्यावर मुख्य नायिका म्हणून चमकायचे होते. याच ओढीतून त्यांनी ‘बी-ग्रेड’ चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे त्यांची ‘कुंती’ म्हणून असलेली सात्विक प्रतिमा डागाळली गेली. मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि हळूहळू त्यांना काम मिळेनासे झाले.
आजचे एकाकी आयुष्य एकेकाळी नीतू कपूर यांच्यासारख्या अभिनेत्रींच्या जवळच्या मैत्रिणी असलेल्या नाजनीन आज कुठे आहेत, हे कोणालाच माहीत नाही. गेल्या ३७ वर्षांपासून त्या ग्लॅमरच्या जगापासून पूर्णपणे दूर आहेत. एकेकाळची ही लोकप्रिय अभिनेत्री आज गुमनामीचे आणि एकाकी आयुष्य जगत आहे.
