भारतीय आणि जागतिक चित्रकलेच्या इतिहासात आपल्या कुंचल्याने क्रांती घडवून आणणाऱ्या महान चित्रकार अमृता शेरगिल यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. प्रसिद्ध आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दिग्दर्शिका मीरा नायर यांनी त्यांच्या आगामी ‘अमरी’ (Amri) या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली असून, चित्रपटाचा ‘फर्स्ट लुक’ देखील रिलीज केला आहे. हा चित्रपट अमृता शेरगिल यांच्या वादळी आणि प्रेरणादायी आयुष्यावर आधारित असणार आहे.
चित्रपटाची स्टारकास्ट आणि प्रियांका चोप्राची एन्ट्री या महत्त्वाकांक्षी बायोपिकमध्ये अमृता शेरगिल यांची मुख्य भूमिका अभिनेत्री अंजली शिवरामन साकारणार आहे. ‘क्लास’ आणि ‘बॅड गर्ल’ सारख्या प्रोजेक्ट्समधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अंजलीचा लूक हुबेहूब अमृता शेरगिल यांच्यासारखा दिसत असल्याने चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास या चित्रपटात ‘मॅडम अझुरी’ (Madame Azurie) ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून ती या चित्रपटाची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर (Executive Producer) देखील आहे. चित्रपटात अमृता यांच्या आईच्या भूमिकेत हॉलिवूड अभिनेत्री एमिली वॉटसन, तर वडिलांच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेता जयदीप अहलावत दिसणार आहे. याशिवाय जिम सर्भ आणि अंजना वसन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
मीरा नायर यांचे स्वप्न पूर्ण ‘सलाम बॉम्बे’, ‘मॉन्सून वेडिंग’ आणि ‘अ सुटेबल बॉय’ सारख्या दर्जेदार कलाकृती देणाऱ्या मीरा नायर यांच्यासाठी हा चित्रपट एका ड्रीम प्रोजेक्टसारखा आहे. आपल्या भावना व्यक्त करताना मीरा नायर म्हणाल्या, “गेल्या काही दशकांत मी बनवलेला प्रत्येक चित्रपट अमृता शेरगिल यांच्या कलेने प्रेरित आहे. त्यांनी मला जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली. युरोपियन तंत्राचा वापर करून त्यांनी भारताचा आत्मा ज्या प्रकारे कॅनव्हासवर उतरवला, तो थक्क करणारा आहे.”
दोन जगांमधील प्रवास हा चित्रपट २० व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ दाखवणार आहे. भारत, हंगेरी आणि फ्रान्स या देशांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होत आहे. हंगेरियन माता आणि भारतीय शीख पिता यांच्या पोटी जन्मलेल्या अमृता यांच्या आयुष्यातील भावनिक संघर्ष, त्यांची ओळख शोधण्याचा प्रवास आणि तत्कालीन समाजाचे नियम मोडून स्वतःची नवी भाषा निर्माण करण्याची त्यांची जिद्द या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले, पण त्यांनी मागे सोडलेला कलेचा वारसा आजही अजरामर आहे.
