HomekonkanChiplunचिपळूण कचरा प्रकल्पात आधुनिक यंत्रणा

चिपळूण कचरा प्रकल्पात आधुनिक यंत्रणा

या मशीनमधून तयार होणाऱ्या प्लेट्स औद्योगिक कारखान्यांतील बॉयलरसाठी वापरण्यात येणार आहेत.

कचऱ्याचे विघटन करून खत तयार करणारी नवीन यंत्रणा चिपळूण नगरपालिकेच्या शिवाजीनगर कचरा प्रकल्पात कार्यान्वित झाली आहे. या मशीनमधून तयार होणाऱ्या प्लेट्स औद्योगिक कारखान्यांतील बॉयलरसाठी वापरण्यात येणार आहेत. येथे रोज तीन टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल. नवीन अत्याधुनिक यंत्र राज्यात प्रथमच चिपळूण पालिकेच्या कचरा प्रकल्पात वापरले जात असून, ते यशस्वी झाल्यास १० टन क्षमतेचे मशीन प्रस्तावित आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली. चिपळूण पालिकेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शहराच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देत कचरा प्रकल्पाला भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष सकपाळ यांनी थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उतरून प्रत्यक्ष पाहणी करत प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. २०२१च्या महापुरात जमा झालेला मोठ्या प्रमाणातील कचरा या ठिकाणी डंप करण्यात आला असून, त्यावर सध्या प्रक्रिया सुरू आहे. हा प्रलंबित कचरा तातडीने हटवून येत्या दीड महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या.

यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले म्हणाले, चिपळूण शहरातून दररोज सुमारे १५ टन कचरा प्रकल्पात येतो. यापैकी सुमारे सहा टन ओला कचरा असून, उर्वरित सुका कचरा आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कचरा प्रकल्पात साठवून न ठेवता त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. नवीन मशीनमधून तयार होणाऱ्या प्लेट्स औद्योगिक कारखान्यांतील बॉयलरसाठी वापरण्यात येणार आहेत. नव्या मशीनमध्ये ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट कशी लावता येईल, यावर आमचा भर आहे. यावेळी नगरसेवक उदय जुवळे, नगरसेवक गणेश आग्रे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते व त्यांचे सहकारी, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, निशांत जंगम आदी उपस्थित होते.

ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत – कचरा प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते, तर तीन टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जात आहे. नवीन मशीन यशस्वी झाल्यास १० टनांची मशीन प्रस्तावित आहे. या मशीनमध्ये ओला आणि सुका कचरा २४ अंश सेल्सिअस तापमानावर जाळून त्याची त्वरित राख केली जाणार आहे. एकूणच कचरा प्रकल्पातील साठलेला कचरा गतीने कमी करण्यावर भर दिला जात आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments