परभणीतील एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी खासदार संजय जाधव उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या भविष्यातील भूमिकेविषयीचे संकेत मिळाले. ते म्हणाले, “ज्यांच्यामुळे मी राजकारणात मोठा झालो, त्यांचा मी कधीही विश्वासघात करणार नाही. मात्र, आजची परिस्थिती खूप बदलली आहे. निवडणुकीच्या रिंगणात ‘आर्थिक गणित’ अत्यंत महत्त्वाचे असते, त्यामुळे भविष्यात काय होईल हे आताच सांगता येणार नाही.”
‘आर्थिक गणिता’चा नक्की अर्थ काय? जाधवांच्या विधानातील ‘आर्थिक गणित’ आणि ‘बदलेली परिस्थिती’ या दोन शब्दांनी राजकीय तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. जरी त्यांनी थेट कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नसले, तरी त्यांच्या विधानाचा रोख बदलत्या राजकीय समीकरणांकडे असल्याचे दिसते. निवडणूक लढवण्यासाठी लागणारी रसद आणि सध्याची राजकीय अस्थिरता पाहता, ते परिस्थितीनुसार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गट की भाजप? चर्चांना उधाण गेल्या काही दिवसांपासून संजय जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. या सोहळ्यातील त्यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे, पत्रकारांनी जेव्हा या विषयावर त्यांना थेट प्रश्न विचारले, तेव्हा त्यांनी कॅमेऱ्यासमोर अधिक स्पष्टीकरण देणे टाळले. त्यांच्या या मौनामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.
ठाकरे गटासाठी मोठा धक्का? संजय जाधव यांनी अद्याप अधिकृतपणे पक्ष सोडण्याची घोषणा केलेली नाही. मात्र, परभणी हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो आणि जाधव तिथले महत्त्वाचे नेते आहेत. जर त्यांनी खरोखरच वेगळी भूमिका घेतली, तर मराठवाड्यात ‘उबाठा’ गटाला हा एक मोठा हादरा ठरू शकतो.
