मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पत्ता उघड केला आहे. माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या राजकारणात सिद्दिकी कुटुंबाचे वजन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
सिद्दिकी कुटुंबाचा राष्ट्रवादीतील प्रवास झिशान सिद्दिकी हे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, काँग्रेसची साथ सोडून अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे बाबा सिद्दिकी हे पहिले बडे नेते होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत झिशान सिद्दिकी यांनीही विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता. आता पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत त्यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले आहे.
अशी झाली उमेदवाराची निवड झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठ्या घडामोडी घडल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये विविध नावांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. या सर्व चर्चेअंती झिशान सिद्दिकी यांच्या नावावर एकमत झाले.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता होती. झिशान सिद्दिकी यांच्या उमेदवारीमुळे आता या निवडणुकीतील रंगत अधिकच वाढली आहे.
