सांगली: बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार आणि चित्रपट निर्माता पलाश मुच्छल याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिच्याशी लग्न मोडल्याच्या चर्चेनंतर, आता पलाशवर सांगलीमध्ये एका गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मृतीचा बालमित्र विज्ञान प्रकाश माने याने पलाशविरुद्ध फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे.
नेमकं प्रकरण काय? तक्रारदार विज्ञान माने हा सांगलीतील एक अभिनेता आणि निर्माता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पलाश मुच्छलने त्याच्या ‘नजरिया’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विज्ञान मानेकडून २५ लाख रुपये घेतले होते. हे पैसे घेताना पलाशने सहा महिन्यांत चित्रपट पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, बराच काळ उलटूनही चित्रपट पूर्ण झाला नाही. जेव्हा विज्ञानने आपले पैसे परत मागितले, तेव्हा दोघांमध्ये वाद झाला.
रागाच्या भरात जातीवाचक वक्तव्य: ही घटना २२ नोव्हेंबर रोजी सांगली-आष्टा रोडवरील टोल प्लाझा परिसरात घडली. विज्ञान मानेच्या आरोपानुसार, पैशांच्या वादातून पलाशने त्याला अतिशय खालच्या भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली आणि अपमानित केले. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी पलाश मुच्छलविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (Atrocities Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
स्मृती मानधनासोबतचे नाते तुटल्यानंतर पलाश आधीच चर्चेत होता, मात्र आता या कायदेशीर कचाट्यामुळे त्याच्यापुढील अडचणी अधिकच गंभीर झाल्या आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
