जर तुमचे खाते देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये (SBI) असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शनिवार, २३ मे २०२६ पासून पुढील सहा दिवस बँकेच्या शाखांमधील प्रत्यक्ष कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सलग येणारा वीकेंड, बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला दोन दिवसांचा देशव्यापी संप आणि त्यानंतर येणारी बकरी ईद (ईद-उल-अजहा) या त्रिवेणी योगामुळे २३ मे ते २८ मे या काळात बँकेला लागोपाठ सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी त्यांची चेक क्लिअरिंग किंवा खात्याशी संबंधित महत्त्वाची कामे आजच म्हणजेच २२ मे रोजी वेळेत पूर्ण करून घ्यावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.
६ दिवस बँका बंद का राहतील? सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक:
बँकेच्या शाखा बंद राहण्यामागे एकापाठोपाठ एक येणारी कारणे खालीलप्रमाणे आहेत: १. २३ मे (चौथा शनिवार): महिन्याचा चौथा शनिवार असल्याने नियमानुसार देशभरातील बँका बंद राहतील. २. २४ मे (रविवार): रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने नेहमीप्रमाणे बँक कामकाज बंद असेल. ३. २५ आणि २६ मे (नियोजित संप): ‘ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन’ (AISBISF) या कर्मचारी संघटनेने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे या दोन दिवसांत शाखा उघड्या असल्या तरी कामावर मोठा परिणाम होईल. ४. २७ आणि २८ मे (बकरी ईद): रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कॅलेंडरनुसार देशात वेगवेगळ्या भागात २७ किंवा २८ मे रोजी बकरी ईदची सुट्टी असेल. जम्मू-काश्मीरमध्ये तर दोन्ही दिवस बँका बंद राहतील.
कर्मचाऱ्यांनी संप का पुकारला आहे? एसबीआय कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित १६ प्रमुख मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामध्ये कंत्राटी पद्धतीवर (Outsourcing) चालणाऱ्या कामांना आळा घालणे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि सशस्त्र सुरक्षा रक्षकांची कायमस्वरूपी भरती करणे, आणि नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मधील कर्मचाऱ्यांना स्वतःचा फंड मॅनेजर निवडण्याचे स्वातंत्र्य देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. या संपाला ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशननेही पाठिंबा दिला आहे.
कोणत्या सेवा बंद राहतील? बँकेच्या शाखा बंद असल्यामुळे प्रत्यक्ष शाखेत जाऊन करावयाची कामे जसे की-
-
चेक जमा करणे आणि क्लिअरन्स (Check Clearing)
-
नवीन बँक खाते उघडणे किंवा केवायसी (KYC) अपडेट करणे
-
पासबुक प्रिंटिंग आणि डिमांड ड्राफ्ट (DD) काढणे
-
कर्ज मंजुरीच्या प्रक्रिया (Loan Processes) या सर्व सेवा पूर्णपणे ठप्प राहतील.
ग्राहकांसाठी मोठा दिलासा! या ऑनलाईन सेवा अविरत सुरू राहतील: बँकेच्या शाखा जरी बंद असल्या, तरी डिजिटल क्रांतीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँकेने स्पष्ट केले आहे की या ६ दिवसांच्या काळात डिजिटल आणि ऑनलाईन सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.
-
एटीएम (ATM) सेवा: पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी एटीएम सुरू राहतील (परंतु सलग सुट्ट्यांमुळे काही ठिकाणी कॅश संपण्याची शक्यता नाकारता येत नाही).
-
इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग: ‘YONO’ ॲप, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता.
-
UPI व्यवहार: गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम द्वारे होणारे यूपीआय (UPI) व्यवहार नेहमीप्रमाणे अखंड सुरू राहतील.
थोडक्यात काय तर… डिजिटल व्यवहार सुरळीत चालणार असले तरी, ज्या कामांसाठी तुम्हाला प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जाणे गरजेचे आहे, अशी कामे खोळंबून राहू नयेत म्हणून आजच नियोजन करा आणि संभाव्य त्रासापासून स्वतःला वाचवा!
