सातारा: आशिया खंडातील सर्वात मोठी आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी ज्ञानाची दारे उघडणारी ‘रयत शिक्षण संस्था’ पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणार आहे. साताऱ्यात पार पडलेल्या बैठकीत शरद पवार यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.
काही काळापूर्वी शरद पवार यांच्या तब्येतीबाबत चर्चा होती, मात्र आता त्यांनी पूर्णपणे सावरून पुन्हा एकदा संस्थेच्या कामात सक्रिय सहभाग घेतला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यकारिणीच्या बैठकीत पवार यांची निवड निश्चित झाली. केवळ अध्यक्षच नव्हे, तर संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी नवीन कार्यकारिणी आणि उपाध्यक्षांचीही निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये आणि रयतच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. रयत शिक्षण संस्था ही केवळ एक संस्था नसून तो एक विचार आहे, आणि शरद पवारांसारख्या अनुभवी नेतृत्वामुळे या विचाराला अधिक बळ मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच संस्थेचे विद्यमान सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांनाही सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
