वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार; व्हाईट हाऊसच्या पार्टीत ट्रम्प थोडक्यात बचावले!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत बंदूकधाऱ्याचा हल्ला; सुरक्षा अधिकारी जखमी.

Must read

वॉशिंग्टन: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये शनिवारी रात्री एका थरारक घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. येथील प्रसिद्ध ‘वॉशिंग्टन हिल्टन’ हॉटेलमध्ये व्हाईट हाऊसच्या पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका शाही मेजवानीत (डिनर पार्टी) एका बंदूकधाऱ्याने अचानक प्रवेश करून बेछूट गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यातून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बालंबाल बचावले आहेत.

नेमकी घटना काय? रात्री साधारण साडेआठची वेळ होती. हॉटेलच्या आलिशान बॉलरूममध्ये पत्रकार, राजकारणी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प, उपाध्यक्ष जे. डी. वन्स आणि त्यांच्या पत्नी उषा वन्स हे या मेजवानीचे मुख्य पाहुणे होते. ट्रम्प व्यासपीठावर पत्रकारांशी संवाद साधत असतानाच बाहेरून जोरात गोळ्या झाडल्याचा आवाज आला. कोल थॉमस ॲलन नावाच्या ३१ वर्षीय हल्लेखोराने सात गोळ्या झाडत बॉलरूमच्या दिशेने घुसण्याचा प्रयत्न केला.

भीतीचे वातावरण आणि सुरक्षा यंत्रणांची सतर्कता: गोळीबाराचा आवाज येताच पार्टीत एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी त्वरित हालचाल करत सर्वांना जमिनीवर झोपण्यास किंवा टेबलाखाली लपण्यास सांगितले. जीव वाचवण्यासाठी अनेक पत्रकार आणि पाहुणे मिळेल तिथे लपले. सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता डोनाल्ड ट्रम्प आणि जे. डी. वन्स यांना सुरक्षित स्थळी हलवले. या झटापटीत एक सिक्रेट सर्व्हिस अधिकारी जखमी झाला आहे, तर दुसऱ्या एका अधिकाऱ्यावर गोळी लागली मात्र बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्यांचे प्राण वाचले.

कोण आहे हल्लेखोर? हल्लेखोर कोल थॉमस ॲलन हा कॅलिफोर्नियातील टोरान्स येथील रहिवासी असून तो एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि गेम डेव्हलपर आहे. विशेष म्हणजे तो ‘नासा’चा फेलो देखील राहिला आहे. एका सुशिक्षित तरुणाने अशा प्रकारचे कृत्य का केले, याचा तपास आता अमेरिकन यंत्रणा करत आहेत.

जुन्या जखमा ताज्या: या घटनेमुळे ४५ वर्षांपूर्वीच्या एका काळ्या आठवणीला उजाळा मिळाला आहे. ३० मार्च १९८१ रोजी याच वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलबाहेर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावरही असाच जीवघेणा गोळीबार झाला होता. सुदैवाने, तेव्हाही रेगन थोडक्यात वाचले होते. आजच्या घटनेने अमेरिकेतील व्हीव्हीआयपी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article