संगमेश्वरमधे बिबट्या जेरबंद; पण आजाराने मृत्यू

या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Must read

संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होताच ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या बिबट्याची गावात मोठी दहशत होती. ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत होते. दरम्यान, या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, बिबट्याला न्यूमोनिया झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. हा बिबट्या आजारी असल्याने तो गावात फिरत होता, अशीही माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. माळवाशी गावात हा बिबट्या गेले अनेक दिवस दिवसाढवळ्या ग्रामस्थांना दर्शन देत होता तसेच शाळकरी मुलांनाही तो जाता-येता दिसत होता. त्यामुळे ग्रामस्थांसह शाळकरी मुलांमध्ये या बिबट्याची मोठी दहशत होती. या बिबट्याची दहशत वाढल्यापासून पालक मुलांना शाळेत सोडायला व आणायला जात असत. शिक्षकही मुलांच्या काळजीपोटी पालक आल्याशिवाय शाळेतून मुलांना सोडत नव्हते, एवढी या बिबट्याची दहशत होती. या बिबट्याने गावातील कुत्र्या मांजरांचा फडशा पाडला होता.

शनिवारी (ता. ३) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास गावातील करंडेवाडी येथे रस्त्याच्या मोरीच्या पाईपमध्ये हा वन्यप्राणी असल्याची माहिती देवरूख वनविभागाला देण्यात आली. यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल सागर गोसावी यांनी वनरक्षक आकाश कडूकर, सूरज तेली, सहयोग कराडे, सुप्रिया काळे आदींसह घटनास्थळी पिंजऱ्यासह जाऊन परिस्थितीची पाहणी केली. रस्त्याच्या मोरीच्या पाईपमध्ये बिबट्या शिरल्याचे दिसून आले. यानंतर तिथे पिंजरा लावून तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात जेरबंद केले. हा बिबट्या मादी जातीचा असून, त्याचे वय सुमारे ३ ते ४ वर्ष आहे. बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली. तो आजारी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचे विच्छेदन करण्यात आले. याचा अहवाल आल्यानंतर त्याला न्यूमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article