औषधी वनस्पतींचे सर्वेक्षण सुरू – नारायण राणे

महोत्सवाच्या माध्यमातून कोकण विकासाला चालना मिळत आहे.

Must read

कोकणातील डोंगरदऱ्यांत मोठ्या प्रमाणात औषध वनस्पती आहेत. त्याचे शासकीयस्तरावर सर्व्हेक्षण होण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व्हेनुसार कोकणातील औषधी वनस्पतींना औद्योगिकदृष्ट्या चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात औषधी वनस्पतींवर आधारित प्रक्रिया उद्योग कोकणात उभे राहतील, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी येथे दिली. वाशिष्ठी डेअरीच्या वतीने शहरातील बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात ५ ते ९ जानेवारीदरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी खासदार राणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात खासदार राणे म्हणाले, ‘पूर्वी कोकणी तरुण नोकऱ्यांसाठी मुंबई-पुण्यात धाव घ्यायचा; मात्र आता कोकणात गरिबी राहिलेली नाही. कोकणात रोजगाराची साधने वाढली असून, कोकण विकासाकडे झेप घेत आहे. हा कृषी महोत्सव पाहून थक्क झालो. वाशिष्ठीचे अध्यक्ष प्रशांत यादव कोकण विकासासाठी योगदान देत आहेत. महोत्सवाच्या माध्यमातून कोकण विकासाला चालना मिळत आहे. शेतकऱ्यांनी शेतीआधारित उद्योगावर भर देऊन आर्थिक उन्नत्ती साधावी.

वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले, कोकणातील भौगोलिक परिस्थिती, पारंपरिक व्यवसाय आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून वाशिष्ठी डेअरी सुरू केली. गेल्या तीन वर्षांत ७ ते ८ हजार शेतकरी या प्रकल्पाशी जोडले गेले. येथे दररोज ५५ हजार लिटर दूध संकलन केले जाते आणि १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर दर दहा दिवसांनी थेट पैसे जमा केले जातात. काजू व फळपीक योजनांच्या माध्यमातून १२२ शेतकऱ्यांना शासन व बँक यंत्रणेशी जोडण्याचे काम सुरू आहे. महोत्सवातून किमान १०० ते २०० शेतकरी स्वयंपूर्ण व्हावेत, हा हेतू असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले. या वेळी प्रगतिशील शेतकरी व बागायतदारांचा काजू कलम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी चिपळूणनगरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, माजी आमदार सदानंद चव्हाण, डॉ. विनय नातू, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, युवानेते अनिरुद्ध निकम आदी उपस्थित होते.

शाश्वत उत्पन्नाचे प्रात्यक्षिक – महोत्सवात १५ ते २० गुंठ्यांवर प्रत्यक्ष ‘लाईव्ह डेमो शेती’ उभारली आहे. चार जनावरांच्या दुग्ध व्यवसायासोबत कुक्कुटपालन, शेळीपालन, भाजीपाला व फळबाग लागवड केल्यास शेतकऱ्याला दरमहा ३० ते ३५ हजार रुपयांचे शाश्वत उत्पन्न कसे मिळू शकते, याचे प्रात्यक्षिक येथे दाखवले आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article