रत्नागिरी शहरातील कचराडेपोला आग परिसरात धुराचे लोट

आगीची तीव्रता जास्त असल्याने दूरवरून धूर दिसत होता.

Must read

शहरातील साळवी स्टॉप येथील कचराडेपोला आज अचानक मोठी आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट उसळत होते, नागरिकांना दुर्गंधी आणि श्वसनाचा त्रास सहन कारावा लागला; मात्र आगीची माहिती मिळताच नगरपालिकेची यंत्रणा सतर्क झाली असून, आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुमारे दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतरही आगीवर नियंत्रण मिळता आले नव्हते. शहरातील साळवी स्टॉप येथील कचराडेपो आहे. दरदिवशी सुमारे २० ते २२ टन कचरा गोळा होतो. हा कचरा या डेपोमध्ये डंपिंग करून ठेवला जातो. विघटन करून तो वेगवेगळा केला जातो; परंतु आता त्यावर प्रक्रिया होत नाही. त्यामुळे कचऱ्याचा ढीगच्या ढीग साठला आहे. कचऱ्यामध्ये प्लास्टिक आणि सुक्या वस्तूंचे प्रमाण असल्याने या कचऱ्याला अचानक आग लागली. काही क्षणात आगीचा भडका झाला आणि सर्वंत्र धुराचे लोट उसळू लागले. आगीची तीव्रता जास्त असल्याने दूरवरून धूर दिसत होता. रत्नागिरी नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला आहे.

अग्निशमन दलाचे जवान पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग आणखी पसरू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ते स्वतः उपस्थित राहून अग्निशमन दलाच्या कामावर देखरेख करत आहेत आणि प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात यावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सध्या आग अटोक्यात आणण्याचे काम सुरू असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही; मात्र अडीच ते तीन तास हा थरार सुरू होता. पालिका आणि एमआयडीसीच्या दोन अग्निशमन बंबाच्या चार फेऱ्या झाल्यानंतर ती आटोक्यात आली असली तरी पूर्णपणे नियंत्रणात आली नव्हती. दरम्यान नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, नगरसेवकी पूजा पवार आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सायंकाळी आग आटोक्यात आली.

खतनिर्मितीची प्रक्रिया लवकरच सुरू – डंपिंग ग्राऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. यापूर्वी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्माण केले जात होते; परंतु पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर आणि पावसामुळे ही प्रक्रिया थांबली होती. आम्ही लवकरच याबाबत निर्णय घेऊन डेपोतील कचरा कमी करण्यासाठी पुन्हा ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करत आहोत, अशी माहिती नगरसेवक सौरभमलुष्टे यांनी दिली.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article