HomeRatnagiriकॉपीमुक्तीसाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे दहावी, बारावी बोर्ड परीक्षा

कॉपीमुक्तीसाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे दहावी, बारावी बोर्ड परीक्षा

१७१२ खोल्यांमध्ये आतापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी कोकण मंडळांतर्गत १७५ केंद्रांपैकी ७० म्हणजे ४० टक्के केंद्रांनी आज अखेर परीक्षेशी संबंधित प्रत्येक वर्ग खोलीत कॅमेरे बसविले आहेत. उर्वरित १०५ परीक्षा केंद्रांच्या संस्थाचालक व प्राचार्यांना बैठका घेऊन पुढील दहा दिवसांत कॅमेरे बसविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. परीक्षाकेंद्राचे केंद्र संचालक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. बारावीची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी आणि लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च आणि दहावीची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारी, लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होईल. शासननिर्णय १३ मे २०२५ नुसार शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दहावी-बारावीच्या सर्व परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत राज्य मंडळाने निर्देश दिले आहेत.

कॅमेरे बसविल्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक केंद्रावरील सीसीटीव्ही फूटेज जतन करून ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. उपद्रवी व संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी करून विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तिथले सीसीटीव्हीचे ऑनलाईन फूटेज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती यांच्याकडे देण्यात येणार आहे. परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी सर्वच परीक्षा केंद्रांचे केंद्रसंचालक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. गतवर्षी दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार झाला नव्हता व बारावीच्या परीक्षेत एकच कॉपीचा प्रकार निदर्शनास आला होता.

१७१२ वर्गात सीसीटीव्ही – एकूण १७५ केंद्रे असून, त्यापैकी १०वीसाठी ११४ व इ. १२वीसाठी ६१ केंद्रे आहेत. परीक्षेसाठी तीन हजार ४० वर्ग खोल्यांची आवश्यकता असून, त्यापैकी १७१२ खोल्यांमध्ये आतापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित १३२८ वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबत संबंधित परीक्षा केंद्र असलेल्या संस्थाचालकांना निर्देश देण्यात आले आहेत. १२वीसाठी २१ जानेवारी व १०वीसाठी ३० जानेवारीपर्यंत अतिविशेष अतिविलंब शुल्कासह फॉर्म भरता येणार आहेत. १० जानेवारीअखेर कोकण विभागीय मंडळात १०वीसाठी २५ हजार ७४८ व १२वीसाठी २३ हजार ९९४ आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने भरली आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments