काय आहे ‘प्रोजेक्ट फ्रीडम’? होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) अडकलेली व्यापारी जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने सोमवारपासून ही मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेसाठी अमेरिकेने आपली महाकाय युद्धनौका ‘यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश’ देखील तैनात केली होती. मात्र, अवघ्या २४ तासांतच ट्रम्प यांनी ही मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानची मध्यस्थी आणि ट्रम्प यांचा निर्णय: न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने केलेल्या विशेष विनंतीनंतर ट्रम्प यांनी हा पवित्रा घेतला आहे. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये सकारात्मक प्रगती होत असल्याचे संकेत मिळाल्याने अमेरिकेने ‘बॅकफूट’वर जाणे पसंत केले. या निर्णयावर इराणने मात्र आपली पाठ थोपटून घेतली आहे. “अमेरिकेला सामुद्रधुनी खुली करण्यात अपयश आले, त्यामुळेच ट्रम्प यांना माघार घ्यावी लागली,” असा दावा इराणच्या सरकारी माध्यमांनी केला आहे.
गेल्या २४ तासांतील महत्त्वाच्या घडामोडी:
१. इराणचे प्रतिहल्ला सत्र: ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ सुरू होताच इराण आक्रमक झाला होता. त्यांनी दक्षिण कोरियन जहाजावर हल्ला केला आणि संयुक्त अरब अमिरातीवर (UAE) क्षेपणास्त्रे डागली. इराणने स्पष्ट इशारा दिला होता की, त्यांच्या परवानगीशिवाय होर्मुझमधून एकही जहाज हलणार नाही.
२. यूएनमध्ये नवा प्रस्ताव: अमेरिकेने होर्मुझमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक ठराव मांडला आहे. यात इराणला समुद्री चाचेगिरी, सुरुंग पेरणी आणि अवैध टोल वसुली थांबवण्याचे आवाहन केले आहे.
३. भारताचा तीव्र संताप: या संघर्षात फुजैराह येथील हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. भारताने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे त्वरित थांबवावे, अशी कडक भूमिका घेतली आहे.
४. चीनची नवी चाल: अमेरिकेच्या निर्बंधांना उत्तर देण्यासाठी चीनने एक नवीन कायदा लागू केला आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादल्यास चीन आता कायदेशीर कारवाई करणार आहे.
सध्या इराणने याला आपला ‘विजय’ मानले असले तरी, अमेरिकेची ही माघार तात्पुरती आहे की कायमस्वरूपी, हे येणारा काळच ठरवेल.
