कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या वर्तुळात सध्या एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे एका बड्या अधिकाऱ्यावर झालेली कारवाई. रस्त्यांच्या कामाची बिले मंजूर करण्यासाठी आणि सुरक्षा ठेव (Security Deposit) परत करण्यासाठी कंत्राटदाराकडे चक्क ६ टक्के कमिशनची मागणी करणाऱ्या लेखाधिकाऱ्याचा कारभार आता उघड झाला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) याप्रकरणी लेखाधिकारी विकास वैजीनाथ चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला असून यामुळे पालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमके प्रकरण काय? तक्रारदार कंत्राटदाराची ‘नवनिर्माण इंटरप्रायजेस’ नावाची कंपनी आहे. या कंपनीला बदलापूर नगरपरिषदेमार्फत शहरातील ७७ रस्ते विकास कामांचे कंत्राट मिळाले होते. नियमानुसार कामे पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराचे १७ लाख ४४ हजार रुपयांचे बिल आणि आधीच्या कामांची ४ लाख ९९ हजार रुपयांची सुरक्षा ठेव, अशी एकूण २२ लाख ४३ हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती.
मात्र, ही हक्काची रक्कम खात्यात जमा झाली असली, तरी त्याचा ‘मोबदला’ म्हणून लेखाधिकारी विकास चव्हाण यांनी कंत्राटदाराकडे एकूण रकमेच्या ६ टक्के म्हणजेच १ लाख ३४ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. कंत्राटदाराने या जाचाला कंटाळून अखेर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
एसीबीचा ससेमिरा आणि कारवाई: डिसेंबर २०२५ मध्ये या प्रकरणाची तक्रार मुंबई एसीबीकडे करण्यात आली होती. १० डिसेंबर रोजी अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर या अर्जाची सखोल चौकशी करण्यात आली आणि अखेर ३० एप्रिल २०२६ रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात विकास चव्हाण यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
मोठी साखळी उघड होणार? विकास चव्हाण हे वर्ग-१ चे अधिकारी असून ते ठाण्यातील समता नगर भागात राहतात. विशेष म्हणजे, नगरपरिषदेत बिले मंजूर करण्यासाठी ‘टक्केवारी’ ठरलेली असते का? आणि या रकमेत आणखी कोणत्या बड्या नेत्यांचा किंवा अधिकाऱ्यांचा वाटा होता का? याचा तपास आता एसीबी करत आहे. या कारवाईमुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, येणाऱ्या काळात आणखी काही ‘मोठे मासे’ गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
