बलुचिस्तान खाण प्रकल्प: अमेरिकेची ६४,००० कोटींची गुंतवणूक आणि सुरक्षेचा धोका

'रेको डिक' प्रकल्पावरून अमेरिका-पाकिस्तानमध्ये करार; बलुच बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे चिंतेचे वातावरण.

Must read

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांत सध्या जागतिक राजकारणाचे केंद्र बनला आहे. जगातील सर्वात मोठ्या सोन्या आणि तांब्याच्या साठ्यांपैकी एक असलेल्या ‘रेको डिक’ (Reko Diq) प्रकल्पात अमेरिकेने तब्बल ६४,००० कोटी रुपयांची (सुमारे १.३ अब्ज डॉलर्स) गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. मात्र, या प्रचंड गुंतवणुकीसोबतच सुरक्षेचा मोठा पेच निर्माण झाला असून, हा प्रकल्प यशस्वी होणार की हिंसाचाराच्या सावटाखाली दबला जाणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

काय आहे ‘प्रोजेक्ट व्हॉल्ट’?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘प्रोजेक्ट व्हॉल्ट’ (Project Vault) अंतर्गत ही गुंतवणूक जाहीर केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश जगातील दुर्मिळ खनिजे आणि महत्त्वाच्या धातूंच्या पुरवठा साखळीवर (Supply Chain) आपले नियंत्रण मिळवणे हा आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेबाहेर या प्रकल्पांतर्गत गुंतवणूक होणारा पाकिस्तान हा एकमेव देश ठरला आहे. या माध्यमातून अमेरिकेला चीनचा या क्षेत्रातील प्रभाव कमी करायचा आहे.

गुंतवणुकीचे स्वरूप आणि फायदा:

अमेरिकेची ‘एक्झिम बँक’ (EXIM Bank) या प्रकल्पासाठी आर्थिक रसद पुरवणार आहे. यातून मोठ्या प्रमाणावर अमेरिकन खाण उपकरणे पाकिस्तानला दिली जातील. या प्रकल्पामुळे बलुचिस्तानमध्ये सुमारे ७,५०० तर अमेरिकेत ६,००० नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सुरक्षेचे मोठे आव्हान:

एककीडे अब्जावधींच्या गुंतवणुकीची भाषा होत असताना, दुसरीकडे बलुचिस्तानमधील जमिनी वास्तव अत्यंत भयावह आहे. नुकत्याच झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात या खाण प्रकल्पाशी संबंधित १० लोकांचा बळी गेला आहे. बलुच फुटीरतावादी गट या प्रकल्पाला कडाडून विरोध करत आहेत. “आमची नैसर्गिक साधनसंपत्ती परकीय देशांनी लुटू नये,” अशी तिथल्या स्थानिकांची भावना आहे. यामुळेच या खाणींवर सतत हल्ले होत असून, अमेरिकन कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना तिथे काम करणे जीवघेणे ठरू शकते.

पाकिस्तानची कोंडी:

पाकिस्तान सध्या प्रचंड आर्थिक संकटातून जात आहे. अशा वेळी ही गुंतवणूक त्यांच्यासाठी ‘लाईफलाईन’ ठरू शकते. मात्र, जर बलुच बंडखोरांना रोखण्यात पाकिस्तानी सैन्य अपयशी ठरले, तर ही गुंतवणूक पाण्यात जाण्याची भीती आहे. चीननेही यापूर्वी येथे हात आजमावून पाहिला होता, पण सततच्या हल्ल्यांमुळे त्यांनाही माघार घ्यावी लागली होती. आता अमेरिका यात यशस्वी होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article