दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनिवास याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि अॅक्शनने प्रेक्षकांची मने जिंकणारा हा ३३ वर्षीय अभिनेता आता खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकला आहे. २९ एप्रिल रोजी तिरुमला येथील पवित्र मंदिरात त्याने आपली प्रेयसी काव्या रेड्डी हिच्यासोबत सप्तपदी घेतल्या.
शाही थाट आणि पारंपरिक पद्धत हा विवाहसोहळा अत्यंत शाही पद्धतीने पार पडला असला तरी, त्यात पारंपरिक संस्कृतीचा गोडवा पाहायला मिळाला. तिरुमला मंदिराच्या पवित्र वातावरणात पार पडलेल्या या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दाक्षिणात्य पद्धतीच्या पेहरावात हे जोडपे अतिशय देखणे दिसत होते.
नवरीची हटके एन्ट्री ठरली आकर्षणाचे केंद्र या लग्नातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे नवरीची, म्हणजेच काव्या रेड्डीची एन्ट्री! सहसा लग्नात नवरीची एन्ट्री ही फुलांच्या चादरीखाली किंवा पालखीतून होताना आपण पाहतो. मात्र, काव्याने या सर्वांपेक्षा वेगळी निवड केली. तिने ना घोडा निवडला ना हत्ती, तर चक्क एका मोठ्या सुशोभित ‘टोपलीत’ बसून तिने लग्नमंडपात प्रवेश केला. ही पारंपरिक दाक्षिणात्य पद्धत पाहून उपस्थित सर्वच पाहुणे थक्क झाले.
शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर हे फोटो समोर येताच बेल्लमकोंडा श्रीनिवासच्या चाहत्यांनी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. श्रीनिवासच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने तेलुगू आणि हिंदी (छत्रपती रिमेक) चित्रपटांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्याच्या आयुष्यातील या नवीन इनिंगसाठी सर्वजण त्याला शुभेच्छा देत आहेत.
