कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक सराफ अन् निवेदिता सराफ यांचा मराठमोळा अंदाज; पारंपरिक लूकने वेधले जगाचे लक्ष

फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची पैठणी आणि जोधपुरी लूकमध्ये दिमाखदार एन्ट्री.

Must read

सिनेसृष्टीतील जगप्रसिद्ध आणि अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६’ (Cannes Film Festival 2026) सध्या फ्रान्समध्ये मोठ्या थाटामाटात सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात जगभरातील दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रेड कार्पेटवर बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस आणि हटके लुक्सची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, यंदाचा कान्स फेस्टिव्हल मराठी रसिकप्रेक्षकांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे; कारण मराठी सिनेसृष्टीचे लाडके ‘अशोकमामा’ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी या आंतरराष्ट्रीय मंचावर आपली ओळख दाखवून दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी, अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर अतिशय दिमाखात हजेरी लावली. वयाच्या ७८ व्या वर्षीही अशोक सराफ यांची ऊर्जा, दांडगा आत्मविश्वास आणि त्यांची स्टाईल पाहून उपस्थित थक्क झाले. रेड कार्पेटवर एन्ट्री करताना अशोकमामांनी निवेदिता सराफ यांचा हात हातात धरला होता. या जोडप्याची एन्ट्री होताच तिथल्या कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकू लागले आणि सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या.

परदेशी भूमीवर जपलं ‘मराठीपण’

नेहमीच ग्लॅमर आणि पाश्चात्त्य फॅशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या कान्सच्या रेड कार्पेटवर या ज्येष्ठ दांपत्याने अस्सल महाराष्ट्रीयन संस्कृतीची झलक दाखवली. निवेदिता सराफ यांनी पारंपरिक भरजरी पैठणी साडी नेसून, त्यावर सुंदर पारंपरिक दागिने परिधान केले होते. तर अशोक सराफ यांनी अत्यंत एलिगंट अशा पांढऱ्या रंगाच्या जोधपुरी जॅकेट सूटमध्ये रॉयल लूक केला होता. त्यांच्या या साध्या, पण तितक्याच वजनदार आणि पारंपरिक लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेटकऱ्यांकडून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मराठी कलाकारांची कान्समध्ये धूम

यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये केवळ सराफ दांपत्यच नाही, तर मराठी सिनेसृष्टीतील इतर लोकप्रिय चेहरेही फॅशनची जादू दाखवत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर (कोकण हार्टेड गर्ल) यांनीही पारंपरिक मराठी पेहराव करत फ्रान्सच्या भूमीवर मराठी संस्कृतीचा डंका वाजवला आहे. या सर्व कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, ‘मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा आहे’ अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून उमटत आहेत.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article