पुणे: पुण्यनगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वैशाखी पौर्णिमेचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या शुभ मुहूर्तावर लाडक्या बाप्पाला तब्बल ५ हजार शहाळ्यांचा (नारळ पाणी) महानैवेद्य अर्पण करण्यात आला.
मंदिरात शहाळ्यांची आकर्षक सजावट वैशाखी पौर्णिमेनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आणि परिसरात शहाळ्यांची अतिशय सुबक आणि मनमोहक आरास करण्यात आली होती. हिरव्यागार शहाळ्यांनी सजलेले मंदिर पाहून भाविक भारावून गेले होते. उन्हाचा वाढता तडाखा पाहता, गारवा देणाऱ्या या शहाळ्यांच्या माध्यमातून बाप्पाला अभिषेक आणि नैवेद्य दाखवण्याची ही अनोखी संकल्पना भाविकांच्या विशेष पसंतीस पडली.
सुख-समृद्धी आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना सध्या महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील जनतेचे आणि बळीराजाचे वाढत्या उन्हापासून रक्षण व्हावे, तसेच यंदा वरुणराजाची कृपा होऊन समाधानकारक पाऊस पडावा, असे साकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी घालण्यात आले.
समाजसेवेचा वसा: रुग्णांना होणार वाटप दगडूशेठ हलवाई ट्रस्ट नेहमीच सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असते. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केलेली ही सर्व ५ हजार शहाळी नंतर फेकून न देता, ती प्रसाद म्हणून पुण्यातील ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तील गरजू रुग्णांना वाटण्यात येणार आहेत. उष्णतेच्या दिवसात रुग्णांना या शहाळ्यांच्या पाण्याचा मोठा आधार मिळणार आहे.
