रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील बागमांडला फेरीबोट जेटीवर आज एका महाकाय ‘ग्रीन सी टर्टल’ (हिरवे समुद्र कासव) वाहून आले होते. कोकण किनारपट्टीवर या प्रजातीच्या माद्या प्रजननासाठी येतात; मात्र पूर्ण वाढलेला नर आढळण्याची ही या भागातील दुर्मिळ घटना मानली जात आहे. त्या कासवाला वेळास (दापोली) येथील तरुणांनी पुन्हा समुद्रात सोडले. सोमवारी सकाळी बागमांडला येथील नवीन जेट्टीच्या कामावर असलेल्या आकाश सुरेश पाडलेकर (रा. वेळास) या तरुणाला चिखलात एक मोठे कासव अडकल्याचे दिसले. त्याने तातडीने याची कल्पना संबंधित विभागाला दिली. माहिती मिळताच ‘मॅनग्रोव्ह सेल’चे (कांदळवन कक्ष) सहाय्यक वनसंरक्षक आणि अलिबाग येथील परिक्षेत्र वनअधिकारी यांना बोलावण्यात आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ते कासव ‘ग्रीन सी टर्टल’ प्रजातीचे ‘नर’ असल्याचे स्पष्ट झाले.
ओहोटी लागल्यामुळे पाणी कमी झाले आणि हे कासव चिखलात अडकले होते. सुदैवाने या कासवाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नव्हत्या. कासव चिखलात अडकल्याने त्याला पुन्हा समुद्रात जाणे अशक्य झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मारळ येथील बीच व्यवस्थापक जयंत कानडे, संकेत मयेकर, हरिहरेश्वरचे संतोष मयेकर, सुबोध खोपटकर, मॅनग्रोव्ह सेलचे गार्ड तुषार भटे, ऋषिकेश लव्हटे आणि स्थानिक फेरीबोट कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावमोहीम हाती घेतली. त्या सर्वांनी मिळून त्या कासवाला जेट्टीवर उचलून घेतले आणि सुरक्षितरीत्या जुन्या जेट्टीवरील खोल पाण्याजवळ नेले. कासवाची प्रकृती उत्तम असल्याची खात्री केल्यानंतर त्याला पाण्यात सोडण्यात आले. अवघ्या काही मिनिटांत कासव समुद्रात झेपावले.
…. असा आहे कासवाचा आकार – लांबी (डोके ते शेपटी) : १९० सेमी (६ फूट ३ इंच)
पाठीची लांबी : ६५ सेमी (२.११ फूट)
रुंदी : ६२.५ सेमी (२ फूट)
शेपटीची लांबी : ३६ सेमी
माद्या अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर – कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले किंवा ग्रीन सी टर्टलच्या माद्या अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात, हे सर्वश्रुत आहे; मात्र, इतक्या मोठ्या आकाराचा ‘नर’ कासव जिवंत अवस्थेत किनाऱ्याला लागण्याची ही रायगड-रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच वेळ असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ आणि वन्यजीवप्रेमींनी या यशस्वी बचाव मोहिमेचे कौतुक केले आहे.
