नवी दिल्ली: आयपीएल २०२६ चा थरार आता निर्णायक टप्प्यावर आला असून आज क्रिकेट चाहत्यांना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. दिल्लीच्या घरच्या मैदानावर, म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना केवळ गुणतालिकेतील लढाई नसून ‘करो या मरो’ची परिस्थिती आहे.
दिल्लीसाठी अस्तित्वाची लढाई दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत १० सामने खेळले असून केवळ ८ गुणांसह ते सातव्या स्थानावर आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल, तर दिल्लीला त्यांचे उर्वरित चारही सामने जिंकणे अनिवार्य आहे. दिल्लीची सर्वात मोठी अडचण त्यांची फलंदाजी ठरतेय. मागील काही सामन्यांत फिरकी गोलंदाजांसमोर दिल्लीचा टॉप ऑर्डर अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आहे. कर्णधार अक्षर पटेल आणि फॉर्मात असलेला केएल राहुल (ज्याने या हंगामात १८० च्या स्ट्राईक रेटने ४४५ धावा केल्या आहेत) यांच्यावर संघाची मदार असेल.
कोलकातासमोर सातत्य राखण्याचे आव्हान दुसरीकडे, गुणतालिकेत आठव्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला पुढील फेरीत जाण्यासाठी त्यांचे पाचही सामने जिंकणे आवश्यक आहे. केकेआरची ताकद त्यांची फिरकी गोलंदाजी आहे. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी ठरत आहेत. मात्र, फलंदाजीत रिंकू सिंग वगळता इतर खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य नसल्याने चिंतेचे वातावरण आहे.
मैदानाचा इतिहास आणि हवामान अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी सहसा फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. लहान बाउंड्रीमुळे येथे धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत पावसाची शक्यता नसून हवामान क्रिकेटसाठी अनुकूल असेल.
