पाकिस्तानमध्ये आश्रयाला असलेल्या आणि भारताच्या विरोधात कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांसाठी सध्या काळ कठीण सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानातील विविध शहरांमध्ये भारताच्या शत्रूंचा ‘टार्गेट किलिंग’द्वारे खात्मा होत असतानाच, आता जैश-ए-मोहम्मद या धोकादायक दहशतवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. जैशचा टॉप कमांडर मौलाना सलमान अजहर याचा बहावलपूरमध्ये एका रस्ते अपघातात संशयास्पद मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान अजहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा अत्यंत जवळचा मानला जात असे. बहावलपूर येथे तो प्रवास करत असताना त्याच्या कारला भीषण अपघात झाला. मात्र, हा निव्वळ अपघात आहे की घातपात, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तानात गेल्या काही काळात अनेक भारतविरोधी दहशतवादी अशाच प्रकारे ‘अज्ञात’ हल्ल्यांमध्ये किंवा संशयास्पद अपघातांमध्ये मारले गेले आहेत.
सलमान अजहरच्या मृत्यूमुळे जैश-ए-मोहम्मदच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. भारतविरोधी कारवायांचे नियोजन आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात त्याचा मोठा हात असायचा. पाकिस्तानात सुरक्षित आहोत असे समजणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये आता ‘अज्ञाता’च्या दहशतीने भीतीचे वातावरण पसरले आहे. एकामागून एक दहशतवादी संपवले जात असल्याने पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा आणि आयएसआय (ISI) देखील चक्रावून गेली आहे.
