‘तौबा तौबा’ आणि ‘सॉफ्टली’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांनी तरुणाईला वेड लावणारा पंजाबी गायक करण औजला सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याच्या एका कथित ट्विटचा स्क्रीनशॉट वाऱ्यासारखा पसरला आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या व्हायरल पोस्टमध्ये करणने स्वतःला ‘बायसेक्शुअल’ (Bisexual) असल्याचे जाहीर केल्याचा दावा करण्यात आला होता.
नेमके प्रकरण काय? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, जो करण औजलाच्या अधिकृत वाटणाऱ्या एका ‘X’ (ट्विटर) हँडलचा आहे. यामध्ये लिहिले होते, “इथपर्यंत पोहोचायला मला खूप वेळ लागला, पण आता मी मोकळेपणाने बोलू शकतो. मी बायसेक्शुअल आहे आणि हे सांगताना मला आनंद होत आहे.” ही पोस्ट समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
ट्विटमधील ‘त्या’ चुकांनी संशय वाढवला हा स्क्रीनशॉट बारकाईने पाहिल्यास त्यात अनेक त्रुटी असल्याचे समोर आले. ज्या हँडलवरून हे ट्विट झाले होते, त्याचे नाव करणच्या अधिकृत नावापेक्षा वेगळे होते. शिवाय, या पोस्टमध्ये ‘finally’ ऐवजी ‘firally’ असे स्पेलिंगचे अनेक दोष होते. विशेष म्हणजे, करण औजलाचे ‘X’ वर कोणतेही अधिकृत व्हेरिफाईड खाते सध्या अस्तित्वात नाही; तो प्रामुख्याने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर सक्रिय असतो.
करणच्या टीमने काय म्हटले? वाढता वाद पाहून अखेर करण औजलाच्या टीमने यावर मौन सोडले आहे. “हे व्हायरल होत असलेले ट्विट पूर्णपणे बनावट (Fake) असून त्याचा करणशी कोणताही संबंध नाही,” असे स्पष्टीकरण टीमकडून देण्यात आले आहे. ज्या हँडलवरून ही पोस्ट करण्यात आली होती, ते आता सोशल मीडियावरून गायब झाले आहे. त्यामुळे हा केवळ खोडसाळपणा असल्याचे सिद्ध झाले असून चाहत्यांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
