मुंबई: महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. राज्यातील करोडो महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या महिलांनी अद्याप आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांच्याकडे आता केवळ ३ दिवसांचा अवधी उरला आहे.
काय आहे नेमका प्रकार? योजनेचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचावा आणि पारदर्शकता राहावी यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे त्यांचे नाव लाभार्थी यादीतून तात्पुरते वगळण्यात आले होते. अशा महिलांना आपली चूक सुधारण्यासाठी महिला व बालविकास विभागाने वारंवार मुदतवाढ दिली होती. ही मुदत आता येत्या ३० एप्रिल रोजी संपत आहे.
मार्चचा हप्ता कधी मिळणार? फेब्रुवारी महिन्याचा हप्ता २४ मार्च रोजी महिलांच्या खात्यात जमा झाला होता. त्यानंतर आता एप्रिल महिना संपत आला तरी मार्च महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले आहेत. ३० एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास, मार्च आणि एप्रिल असे दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घरी बसून करा ई-केवायसी दुरुस्ती: ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांनी त्वरित ‘ladakibahin.maharashtra.gov.in’ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला आधार क्रमांक टाकून ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर ३० एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही, तर या योजनेचे १५०० रुपये कायमचे बंद होऊ शकतात.
