पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये असलेली निकालाची उत्सुकता आता संपली आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
विभागावार कामगिरी: यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.६२ टक्के लागला आहे. तर दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.४१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्याचा एकूण निकाल सुमारे २ टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळत आहे.
निकाल कसा पाहाल? विद्यार्थ्यांना आज दुपारी १ वाजल्यापासून खालील अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल: १. mahresult.nic.in २. sscresult.mahahsscboard.in ३. results.digilocker.gov.in
निकाल पाहण्याची सोपी पद्धत:
-
सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवर जा.
-
‘SSC Examination March 2026 Result’ या लिंकवर क्लिक करा.
-
तुमचा परीक्षा क्रमांक (Seat Number) टाका.
-
आईच्या नावाचे पहिले अक्षर किंवा पूर्ण नाव (आईचे नाव फॉर्मवर असल्यानुसार) टाईप करा.
-
‘View Result’ वर क्लिक करताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तुम्ही याची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.
एसएमएस (SMS) द्वारे निकाल: जर इंटरनेट उपलब्ध नसेल, तर विद्यार्थी आपल्या मोबाईलवरून MHSSC Seat Number टाईप करून ५७७६६ या क्रमांकावर पाठवूनही निकाल मिळवू शकतात.
पुनर्मूल्यांकन आणि गुणपडताळणी: ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका आहे, त्यांच्यासाठी बोर्डाने ‘गुणपडताळणी’ आणि ‘उत्तरपत्रिकेची छायाप्रत’ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सोय केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून विहित शुल्कासह अर्ज करावा लागेल.
