मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा ‘मिस्टर ३६०’ आणि टी-२० संघाचा धडाकेबाज कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या क्षणांचा अनुभव घेत आहे. सूर्या आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांच्या घरी एका चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. ७ मे २०२६ रोजी देविशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, सूर्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सूर्याने आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने म्हटले की, “हास्य, प्रेमळ मिठी आणि साकार होणाऱ्या स्वप्नांसह, आम्ही आमच्या मुलीचे मनापासून स्वागत करतो.” सूर्याच्या या पोस्टनंतर क्रिकेट विश्वातून आणि चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आरसीबीविरुद्धच्या सामन्याला मुकणार? सध्या आयपीएल २०२६ चा हंगाम रंगात आला आहे. मात्र, या आनंदाच्या प्रसंगी कुटुंबासोबत राहण्यासाठी सूर्यकुमार रायपूरला (जिथे पुढील सामना होणार आहे) रवाना झालेला नाही. यामुळे १० मे रोजी होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सूर्यकुमार खेळण्याची शक्यता धूसर आहे.
लेकीच्या आगमनाने बदलणार का नशीब? आयपीएलच्या या हंगामात सूर्यकुमार यादवला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. १० सामन्यांत त्याने केवळ १९५ धावा केल्या आहेत. खराब फॉर्ममुळे त्याच्यावर काही प्रमाणात टीकाही होत होती. मात्र, आता घरामध्ये लक्ष्मीचे आगमन झाल्याने सूर्याच्या आयुष्यात आणि खेळाच्या मैदानात ‘लेडी लक’ फळफळणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ सध्या गुणतालिकेत खालच्या स्थानावर संघर्ष करत आहे. अशा वेळी सूर्यासारख्या अनुभवी खेळाडूचे मैदानात नसणे संघासाठी चिंतेची बाब असली, तरी वैयक्तिक आयुष्यातील हा मोठा आनंद सूर्याला पुन्हा एकदा त्याच जोमाने मैदानात उतरण्यासाठी ऊर्जा देईल, अशी सर्वांना आशा आहे.
